तिरुपती लाडू वादाची होणार SIT चौकशी, मंदिर शुद्धीकरणासाठी महाशांती होम  file photo
राष्ट्रीय

तिरुपती लाडू वादाची होणार SIT चौकशी, मंदिर शुद्धीकरणासाठी महाशांती होम

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : तिरुपती बालाजी मंदिराच्या श्रीवरी लाडूत गाय आणि डुकराची चरबी आढळल्यानंतर देशभरातील कोट्यवधी हिंदू भाविकांना धस्स झाले. या प्रकरणाची आता एसआयटी चौकशी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आदेशानुसार, मंदिराच्या शुद्धीकरणासाठी आज (दि.२३) महाशांती होम सुरू करण्यात आला आहे. (Tirupati Laddu controversy)

मंदिराच्या शुद्धतेसाठी तिरुमला येथे शांती होमम पंचगव्य प्रोक्षण म्हणजेच होमचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या शुद्धीकरणासाठी हा होम श्रीवारी (श्री व्यंकटेश्वर) मंदिरातील बंगारू बावी (गोल्डन विहीर) यज्ञशाळेत (विधीस्थळ) सुरू आहे.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात (लाडूत) फिश ऑईल, बीफ टॅलो (गोवंशाची चरबी) आणि लॉर्ड (डुकराची चरबी) आढळून आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आता तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमध्ये महानिरीक्षक (IG) किंवा त्याहून अधिक दर्जाचे अधिकारी असतील. एसआयटी चौकशीअंती अहवाल शासनाला सादर केला जाईल. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकार याबाबत कठोर कारवाई करणार असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे. (Tirupati Laddu controversy)

तिरुपती लाडू वाद, आतापर्यंत काय घडलं?

  • जुलै २०२३ : कर्नाटक मिल्क फेडरेशनचे नंदिनी तूप याआधी तिरुपतीत वापरले जात होते. नंदिनी तुपाची किंमत वाढवल्याने त्याचा दर ४७५ रुपये किलो होता.

  • जुलै २०२३ : दराचे कारण सांगून देवस्थानाचे सरकारी अधिकारी धर्मा रेड्डी (जगनमोहन यांचे निकटवर्तीय) यांनी नव्या कंपनीला (एआर डेअरी फूड, तामिळनाडू) कंत्राट दिले. नवी कंपनी 320 रुपये किलो दराने तूप पुरवत होती.

  • जून २०२४: आंध्र प्रदेशात एन. चंद्रबाबू नायडू यांचे सरकार स्थापन झाले आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या जुन्या कार्यकारी अधिकार्‍याला हटवून त्यांनी आयएएस अधिकारी के. श्यामला राव यांची या पदावर नियुक्ती केली.

  • जुलै २०२४ : नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालानुसार तुपाच्या नमुन्यांमध्ये गोमांस चरबी, माशाचे तेल, डुकराची चरबी आढळून आली. भेसळीचा अहवाल आल्यानंतर एआर डेअरी फूडचा करार रद्द करण्यात आला.

  • ऑगस्ट २०२४ : एआर डेअरी फूड कंपनीच्या तुपाबाबतचा अहवाल प्राप्त होताच कंत्राट रद्द करण्यात आले आणि पूर्ववत कर्नाटक मिल्क फेडरेशनला ४७० रुपये किलो दराने नंदिनी तुपासाठी कंत्राट देण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT