पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरप्रदेशातील लखमीपूर खीरी येथील दुधवा टायगर रिजर्वमध्ये एक वाघीण अभयारण्यातून चूकून लगतच्या गावात शिरली. या वाघीणीने दोन गावकऱ्यांवर हल्ला केला. यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी या वाघीणीला काठीणे मारहाण करुन मारुन टाकले. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की दुधवा अभयारण्याच्या बाजूलाच असलेल्या फुलवारीया नावाचे गावात ही २ वर्षे वयाची वाघीण शिरली होती. दुधवा बफर झोनचे अधिकारी सौरिश सहाय यांनी सांगितले की पलिया तहसील मंडळातील फूलवारीया गावातून या वाघीणीचे शव ताब्यात घेतले असून, वन्य जीव कायद्यातंर्गत पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हल्ला केलेल्या दोन गावकऱ्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच मृत वाघिंणीचे शवविश्चेदन राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानूसार करण्यात आले. वाघीणीचा विसेरा बरेली येथील भारतीय वन्यजीव संस्थेमध्ये अधिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे.
नरभक्षक वाघांचा हल्ला होण्याच्या घटना समोर येत आहेत. केरळमधील वायनाड जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ मृतावस्थेत आढळला. यावेळी आजूबाजूच्या गावातील लोकांनी आनंद व्यक्त करत मिठाई वाटली होती. या वाघाने सोमवारी कॉफीच्या बागेत काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करुन ठार केले होते. यामुळे या घटनेविरोधात आंदोलन करण्यात आले होते.