इम्फाळ : मणिपूर पोलिसांनी विविध बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असलेल्या तीन दहशतवाद्यांना तसेच एका शस्त्र व्यापार्याला अटक केली आहे. ही कारवाई बिष्णुपूर, इम्फाळ पूर्व व इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात करण्यात आली. बिष्णुपूर जिल्ह्यातील तोंगलोबी परिसरातून बंदी घातलेल्या प्रेपाक संघटनेचे दोन दहशतवादी अटक करण्यात आले.
ठोकचोम मणिमातुम सिंह (वय 20) व लैश्रम प्रेमसागर सिंह (24) अशी त्यांची नावे असून ते सामान्य नागरिक, व्यावसायिक व शाळांकडून खंडणी वसूल करण्याच्या गुन्ह्यांत सामील असल्याचे पोलिसांनी सांगितले. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील काँगबा येथून पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या बंदी घातलेल्या संघटनेचा कार्यकर्ता अटक करण्यात आला. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अधिकारिमायुम रामकुमार शर्मा (62) असे आहे. इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील युरेम्बाम भागात छापा टाकून पोलिसांनी शस्त्र व्यापारी फिजाम चेतंजित सिंह (33) याला अटक केली. त्याच्याकडून स्वयंचलित रायफल, दोन मॅगझिन्स व 96 विविध प्रकारची काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.