नवी दिल्ली : गोव्यात होणाऱ्या ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित गोल्डन पीकॉकसाठी स्पर्धेसाठी जगभरातील १५ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यात तीन भारतीय चित्रपटांचाही समावेश आहे. 'द गोट लाईफ', 'आर्टिकल ३७०' आणि 'राव साहेब' हे तीन चित्रपट स्पर्धेत आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम चित्रपट दिग्दर्शक ब्लेसी यांनी सौदी अरेबियाच्या वाळवंटात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय स्थलांतरित कामगाराची सत्यकथा द गोट लाइफ (इंडिया) या चित्रपटात सांगितली आहे. हा चित्रपट लेखक बेंजामिनच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या मल्याळम कादंबरी आदुजीविथमचे रूपांतर आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित, आर्टिकल ३७० हा चित्रपट घटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर एक राजकीय थ्रिलर आहे. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० शी संबंधित हा चित्रपट आहे. या चित्रपटाने सामाजिक-राजकीय परिस्थितीचे उत्कृष्ट चित्रण केले आहे. चित्रपटात सत्तासंघर्ष आणि वैयक्तिक त्यागाची कथा दिग्दर्शकाने कौशल्याने दाखवली आहे.
याशिवाय या पुरस्कार स्पर्धेसाठी निवडलेला तिसरा भारतीय चित्रपट म्हणजे रावसाहेब. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ हा बहुप्रतिक्षित मराठी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. यावर्षीच्या महोत्सवामध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. निखिल महाजनचा क्राइम थ्रिलर मानव-प्राणी संघर्ष आणि आदिवासींच्या जमिनींमधील न्याय मिळवण्यावर केंद्रित आहे. हा चित्रपट भारतातील आदिवासी भूमीवर आधारित एक मनोरंजक कथा आहे.
या वर्षी, प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक ज्युरीमध्ये सिंगापूरचे दिग्दर्शक अँथनी चेन, ब्रिटिश-अमेरिकन निर्माती एलिझाबेथ कार्लसन, स्पॅनिश निर्माते फ्रान बोर्जिया आणि प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन जिल बिलकॉक यांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कार यासह श्रेणींमध्ये ही ज्युरी विजेते निश्चित करेल. विजेत्या चित्रपटाला महोत्सवातील सर्वोच्च सन्मानासह ४० लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.