राष्ट्रीय

Pitbull Banned : गाझियाबादमध्ये ‘या’ तीन जातीची कुत्री पाळण्यास बंदी

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेगवेगळ्या जातीची कुत्री पाळण्याची अनेकांना हौस असते. मात्र, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद महापालिकेने पिट बुल, रॉटवेलर आणि डोगो अर्जेंटिनो या तीन जातीची कुत्री पाळण्यास (Pitbull Banned) बंदी घातली आहे. गाझियाबादमध्ये पिट बुल्सने अनेकांवर हल्ले केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने बंदी घालण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी पंचकुला, हरियाणातील काही महापालिकेने पिट बुल आणि रॉटवेलर्सवर बंदी घातली आहे.

याबाबत उपमुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनुज सिंग म्हणाले की, मालक नवीन कुत्रे (Pitbull Banned) विकत घेऊ शकणार नाहीत. सध्या त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याची योग्यरित्या निर्जंतुकीकरण, लसीकरण आणि नोंदणी करावी लागणार आहे. कुत्र्यांचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असल्यास, किंवा कुत्र्याचे वय सहा महिन्यांचे झाल्यावर त्याचे निर्जंतुकीकरण करण्याचे हमीपत्र मालकाला द्यावे लागेल. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात येणार आहे. जर मुदत ओलांडली, तर मालकांना कुत्रा विकावा लागेल किंवा स्वत:जवळ ठेवता येणार नाही.

त्याचबरोबर एका फ्लॅटमध्ये जास्तीत जास्त दोन कुत्रे ठेवता येणार आहेत. लोकांच्या घरासमोर कुत्र्यांना खाण्यास मनाई असेल. कुत्र्यांच्या साफसफाईची जबाबदारी श्वान मालकांची असेल. सार्वजनिक उद्याने आणि लिफ्टमध्ये कुत्रे नेण्यास मनाई असेल.

दरम्यान, उमेद फाउंडेशनचे निखिल महेश म्हणाले की, जातीला दोष का द्यायचा? मी अनेक पिट बुल आणि रॉटवेलर्सना वाचवले आहे. जे पूर्णपणे सुरक्षित होते. मालकांना कुत्र्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे माहित नसल्यामुळे कुत्रा हल्ला करतो. कोणतीही जात आक्रमक जन्माला येत नाही. जर त्यांना प्रशिक्षित करून सामाजिक बनवले नाही तर, तुम्हाला अशा प्रकारांना सामोरे जावे लागेल.

दिल्लीस्थित प्राणी कल्याण संस्था फ्रेंडिकोजच्या तंद्राली कुली म्हणाल्या की, ब्लँकेट बंदी हे काही व्यावहारिक पाऊल नाही. त्याऐवजी त्यांनी नोंदणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि मालक कुत्र्याची जबाबदारी घेतील, याची खात्री करावी.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT