राष्ट्रीय

West Bengal Assembly Election : 'ही माझी शेवटची सभा, आता थेट भाजपच्या शपथविधी सोहळ्यालाच येणार'; पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास

Narendra Modi confidence statement : '४ मे रोजी लागणाऱ्या निकालानंतर भाजपच्या शपथविधी सोहळ्यासाठी मला पुन्हा यावेच लागेल, याची आता मला पूर्ण खात्री पटली आहे.'

पुढारी वृत्तसेवा

बॅरकपूर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण शिगेला पोहोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बॅरकपूर येथे 'विजय संकल्प' रॅलीला संबोधित केले. "या निवडणुकीतील ही माझी शेवटची सभा असून, आता मी थेट भाजपच्या शपथविधी सोहळ्यालाच उपस्थित राहणार आहे," अशा शब्दांत पंतप्रधानांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

बॅरकपूरमध्ये परिवर्तनाची लाट

सभेच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी जनसमुदायाचा उत्साह पाहून बंगालमधील बदलाचे संकेत दिले. ते म्हणाले की, बॅरकपूरची ही पावन भूमी परिवर्तनाच्या लाटेला मार्ग मोकळा करत आहे. "बंगालमध्ये मी जिथे जिथे गेलो, तिथे या कडाक्याच्या उन्हातही जनतेचा असा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ४ मे रोजी लागणाऱ्या निकालानंतर भाजपच्या शपथविधी सोहळ्यासाठी मला पुन्हा यावेच लागेल, याची आता मला पूर्ण खात्री पटली आहे," असे मोदींनी नमूद केले.

जनतेच्या प्रेमाने भारावले पंतप्रधान

हेलिपॅडपासून सभास्थळापर्यंतच्या दोन किलोमीटरच्या प्रवासात झालेल्या गर्दीचा उल्लेख करत पंतप्रधान भावूक झाले. "एवढ्या सकाळी हजारो लोक मला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते, याची मी कल्पनाही केली नव्हती. घर सोडल्यापासून तुमच्यामध्ये राहूनच मला सुख आणि समाधान लाभले आहे, तुम्हीच माझे कुटुंब आहात. गेल्या तीन-चार दशकांपासून मी देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहे. पक्षाने कार्यकर्ता म्हणून दिलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पाडली असून, ही निवडणूक प्रक्रियाही त्याचाच एक भाग आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसारखीच अनुभूती

जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत झालेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, "त्यावेळी मी ११ दिवसांचे जे अनुष्ठान केले होते, तशीच काहीशी अनुभूती मला या निवडणुकीत येत आहे. एखाद्या देवीच्या मंदिरात गेल्यावर जी सात्विक भावना मनात असते, तसाच अनुभव मला बंगालमध्ये येत आहे. हे केवळ माझे बंगालप्रती असलेल्या अफाट प्रेमामुळेच शक्य झाले आहे."

विकसित भारतासाठी 'पूर्वोदय' आवश्यक

भारताच्या प्राचीन समृद्धीचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की, प्राचीन काळी भारताच्या वैभवाचे अंग (बिहार), बंग (बंगाल) आणि कलिंग (ओडिशा) हे तीन मुख्य स्तंभ होते. जेव्हा हे स्तंभ कमकुवत झाले, तेव्हा देशाच्या सामर्थ्याला धक्का बसला. "आज जेव्हा भारत विकसित होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहे, तेव्हा अंग, बंग आणि कलिंगाचे सक्षमीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. भारताचा भाग्योदय हा 'पूर्वोदया'शिवाय अपूर्ण आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले.

'वंदे मातरम्' आता नवनिर्माणाचा मंत्र

स्वातंत्र्यलढ्यात 'वंदे मातरम्' हा गुलामीतून मुक्तीचा मंत्र ठरला होता, याची आठवण करून देत पंतप्रधानांनी २१ व्या शतकात या मंत्राला बंगालच्या नवनिर्माणाचा आधार बनवण्याचे आवाहन केले. "बंगालची सेवा करणे, येथील सुरक्षा अबाधित राखणे आणि बंगालपुढील मोठ्या आव्हानांचा सामना करणे, हे माझे भाग्य आणि कर्तव्य दोन्ही आहे. या कर्तव्यापासून मी कदापि मागे हटणार नाही," अशी ग्वाही त्यांनी दिली.

तृणमूलच्या 'महा-जंगलराज'वर कडाडून टीका

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर (TMC) तोफ डागताना पंतप्रधान म्हणाले की, "एकीकडे रोजगार देणाऱ्या गिरण्या बंद पडत आहेत, तर दुसरीकडे गुंडांना आश्रय देणारे बॉम्ब बनवण्याचे कारखाने फोफावत आहेत. तृणमूलच्या 'सिंडिकेट' दुकानांचा विस्तार होत असून हे केवळ 'महा-जंगलराज' आहे. तृणमूलकडे बंगालच्या भविष्यासाठी कोणताही ठोस आराखडा नाही. त्यामुळे बंगालच्या हितासाठी तृणमूलचा पराभव करणे अनिवार्य आहे. भाजप या ठिकाणी सामान्य जनतेचे 'जनार्दन राज' प्रस्थापित करेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT