पुढारी ऑनलाईन डेस्क : Amit shah|केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी "काश्मीरमधील फुटीरतावाद हा इतिहासजमा झाला आहे", अशी पोस्ट शहा यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून आज (दि.२५) केली.
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, "मोदी सरकारच्या एकात्म धोरणांमुळे जम्मू-काश्मीरमधून फुटीरतावाद बाहेर पडला आहे. हुर्रियतशी संबंधित दोन संघटनांनी फुटीरतावादाशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे". भारताची एकता मजबूत करण्याच्या दिशेने उचलेले हे पाऊल असून याचे मी स्वागत करतो आणि अशा सर्व गटांना पुढे येऊन फुटीरतावाद कायमचा सोडून देण्याचे आवाहन करतो.
पुढे गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, " जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद संपत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित, शांत आणि एकात्म भारत निर्माण करण्याचे हे एक मोठे यश असून, त्यांचा हा मोठा विजय आहे".
जम्मू काश्मीरमधील पाकिस्तान समर्थनार्थ आणि भारत विरोधी वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक पक्ष त्यांच्या फुटीरतावादी अजेंडामुळे एकत्र आले. त्यानंतर १९९३ मध्ये हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना झाली. धर्माच्या समानतेवर लक्ष केंद्रित करून जम्मू-काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्यासाठी मोहीम राबवत, या नव्याने स्थापन झालेल्या गटाने लोकांमध्ये पाकिस्तान समर्थक भावना पुनरुज्जीवित करण्यात यश मिळवले. येथील फुटीरतावद्यांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जम्मू-काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करणे हे होते. हुर्रियत आणि जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी गट हा नेहमीच एकमेकांना पूरक राहिला आहे.