राष्ट्रीय

राजकोटअग्निकांडाची उच्‍च न्‍यायालयाने घेतील स्वत:हून दखल, उद्या होणार सुनावणी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेची गुजरात उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल (suo motu) घेतली आहे. या प्रकरणी आता सोमवार, २७ मे रोजी उच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे.

शनिवारी, 25 मे रोजी राजकोटच्या आगीत १२ मुलांसह ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक ( एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. एसआयटी पथकाला ७२ तासांत तपास अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आग कशी आणि का लागली? याची चौकशी केली जाणार आहे. दरम्‍यान,  या दुर्घटनेची गुजरात उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल (suo motu) घेतली आहे. या मुद्द्यावर सोमवार, २७ मे रोजी गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यातील गेम झोनबाबत उच्च न्यायालय उद्या निर्देश जारी करण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

राजकोट टीआरपी मॉलचा गेम झोन खाक; 12 मुलांसह ३० ठार

गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रस्त्यावरील टीआरपी मॉलमधील गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागून त्यात 12 लहान मुलांसह ३० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी 'डीएनए' टेस्ट केली जाणार आहे. आग लागल्यानंतर 10 जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले. गेम झोन पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नेमके किती लोक आत अडकले आहेत, याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. बचाव कार्यात मृतदेह काढले जात आहेत, तसा मृतांचा आकडा वाढत आहे.

गेम झोनमध्ये अनेक ठिकाणी दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लाय व लाकडाचे तुकडे पसरलेले होते. उपस्थित कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र यश आले नाही. अवघ्या 30 सेकंदांत आग संपूर्ण गेम झोनमध्ये पसरली. पेट्रोल आणि डिझेलचे डबेही होते, ते लोक काढू लागले. मागच्या बाजूला गॅस सिलिंडरही ठेवले होते. मॉलमध्ये दोन मजले गेम झोनचे आहेत.

राजकाेटमधील सर्व गेम झोन बंद

राजकोटचे सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व गेमिंग झोनचे ऑडिट केले जाईल. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे राजकोटचे पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT