पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या मौल्यवान रत्नांचा आणि ऐतिहासिक वारशाचा एक अप्रतिम नमुना असलेला गोवळकोंडा ब्लू हिरा आता प्रथमच जागतिक लिलावासाठी सज्ज झाला आहे.
इंदूर आणि बडोद्याच्या राजघराण्याचा हा दुर्मिळ गोवळकोंडा हिरा 14 मे रोजी जिनिव्हा येथील क्रिस्टीजच्या 'मॅग्निफिसंट ज्युएल्स' लिलावात विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. 23.24 कॅरेटच्या या निळसर हिऱ्याची अंदाजे किंमत 300 ते 430 कोटी रुपये दरम्यान असू शकते. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगप्रसिद्ध गोवळकोंडा खाणीतील हा हिरा केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे, तर भारतीय राजघराण्याच्या वारशाचे प्रतिक म्हणूनही ओळखला जातो. या लिलावामुळे पुन्हा एकदा भारताचे ऐतिहासिक दागदागिने आणि गोवळकोंडा हिऱ्यांची जागतिक ख्याती प्रकाशझोतात येणार आहे.
हा लाईव्ह लिलाव जिनिव्हामधील देस बर्जेस येथील फोर सीझन्स हॉटेल येथे होणार आहे.
क्रिस्टीजचे इंटरनॅशनल हेड ऑफ ज्युलरी राहुल कडाकिया यांनी एका निवेदनात सांगितले की, "अशा असामान्य आणि उच्च दर्जाच्या शाही रत्नांना आयुष्यात फक्त एकदाच बाजारात पाहण्याची संधी मिळते.
क्रिस्टीजच्या 259 वर्षांच्या इतिहासात, 'आर्चड्यूक जोसेफ', 'प्रिन्सी' आणि 'विटल्सबाख' यांसारख्या जगातील काही अतिशय प्रतिष्ठित गोवळकोंडा हिरे आम्ही लिलावासाठी सादर केले आहेत.
'द गोलकोंडा ब्लू' हा त्याच्या शाही इतिहासामुळे, अपवादात्मक निळ्या रंगामुळे आणि अनमोल आकारामुळे जगातील सर्वात दुर्मिळ निळ्या हिऱ्यांपैकी एक आहे," असेही त्यांनी नमूद केले.
जगातील सर्वात दुर्मिळ आणि महत्त्वाच्या निळ्या हिऱ्यांपैकी एक म्हणून गौरवलेला हा हिरा भारतीय प्रेक्षकांसाठी खास आहे कारण तो थेट भारतीय राजघराण्याशी संबंधित आहे आणि त्याचा उगम आजच्या तेलंगणामधील गोवळकोंडा खाणीतून झाला आहे. जागतिक दर्जाचे हिरे तयार करण्यासाठी ही खाण प्रसिद्ध होती.
क्रिस्टीजनुसार, हा हिरा इंदूरचे महाराज यशवंतराव होळकर द्वितीय यांच्या मालकीचा होता. 1920-30 च्या दशकात आधुनिक जीवनशैली आणि सौंदर्यदृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या या राजाने या हिऱ्याला आपल्या राजेशाही दागिन्यांच्या संग्रहात ठेवले होते.
नेकलेसमध्ये हिरा
1923 मध्ये महाराजांच्या वडिलांनी फ्रेंच दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शॉमेट (Chaumet) यांच्याकडून या निळ्या हिऱ्यासह एक ब्रेसलेट बनवले होते. याआधी त्यांनी त्याच ज्वेलरकडून प्रसिद्ध "इंदूर पिअर्स" दोन महत्वाचे गोवळकोंडा हिरे विकत घेतले होते.
दहा वर्षांनंतर, महाराजांनी मॉबुसिन (Mauboussin) यांना आपले अधिकृत ज्वेलर नियुक्त केले आणि त्यांनी 'द गोवळकोंडा ब्लू' हिऱ्याला एक भव्य नेकलेस मध्ये रूपांतरित केले, ज्यात "इंदूर पिअर" हिऱ्यांचाही समावेश होता.
हा दागिना फ्रेंच चित्रकार बर्नार्ड बुटे दे मॉनव्हेल यांनी इंदूरच्या महाराणीचे एक चित्र काढताना अजरामर केला, ज्यात इंडो-युरोपियन ऐश्वर्याचे सौंदर्य दिसून येते.
1947 मध्ये, हा हिरा प्रसिद्ध न्यूयॉर्क ज्वेलर हॅरी विन्स्टन यांनी विकत घेतला. त्यांनी त्याला एका व्हाईट डायमंडसह एक आकर्षक ब्रोचमध्ये बसवले. नंतर हा ब्रोच बडोद्याच्या महाराजांकडे गेला आणि तिथून खासगी मालकीकडे गेला.
या हिऱ्याची वैशिष्ट्ये...
वजन: 23.24 कॅरेट
रंग: Vivid Blue (गडद निळसर रंग – अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान)
कट: Elegant Cut – आधुनिक रिंगमध्ये जडवलेले (JAR डिझाइनरने तयार केलेले)
गुणवत्ता: Internally Flawless – म्हणजेच हिऱ्यात कोणतेही अंतर्गत दोष नाहीत, हा प्रकार अतिशय दुर्मिळ असतो