पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा आज (दि.१५) केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबर रोजी तर दुसर्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ( Jharkhand Assembly Election2024)
पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, "झारखंड विधासनभेची मुदत ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे. नवमतदारांची संख्या (पहिल्यांदाच मतदान करणारे ) 11.84 लाख इतकी आहे. राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ८१ विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण २.६ कोटी मतदार आहेत. राज्यातील 1.14 लाख मतदार हे ८५ पेक्षा अधिक वयाचे आहेत. राज्यात 29 हजार 562 मतदान केंद्रे असतील."
झारखंडमध्ये २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ५ टप्प्यात मतदान झाले होते.यानंतर झारखंडमध्ये महाआघाडी म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आले. यामध्ये काँग्रेस, आरजेडी आणि डावे पक्ष यांचा समावेश आहे. नुकताच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने नुकताच झारखंडचा दौरा केला होता. आयोगाच्या पथकाने सर्व पक्षांकडून निवडणुकीबाबत अभिप्रायही घेतला होता. दिवाळी, छठ तसेच राज्य निर्मितीचा दाखला देत १५ नोव्हेंबरनंतर निवडणुका घेण्याचे आवाहन राज्य नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या पथकाला केले होते.
झारखंड विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ ५ जानेवारीला संपत आहे. झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. राज्यात बहुमतासाठी ४१ जागा जिंकणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा ३०, भाजप २५, काँग्रेस १६, जेव्हएम ३, एजीएसयूपी २ इतर ५ असे बलाबल होते. ( Jharkhand Assembly Election2024)
जानेवारी 2024 मध्ये हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तुरुंगात जावे लागले होते. मात्र, जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी १५६ दिवसांत चंपाई सोरेन यांच्याकडून मुख्यमंत्रीपद परत घेतले. यानंतर चंपोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये सोरेन विरुद्ध सोरेन असा सामना पाहायला मिळणार आहे.
भाजपला झारखंडमधील संथाल परगणा आणि कोल्हान विभागातील ३२ जागांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाला संथाल परगणा विधानसभेच्या १८ जागांपैकी केवळ ३ जागा जिंकता आल्या होत्या. तर कोल्हान विभागातील १४ जागांपैकी एकाही जागेवर खातेही उघडता आले नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही जमशेदपूर पूर्वमधून पराभवाला सामोरे जावे लागले होते.