नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख १८ नोव्हेंबरला आहे. दरम्यान, ८ नोव्हेंबर हा तांत्रिकदृष्ट्या विद्यमान सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आता सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचे चिन्ह प्रकरणाचा निकाल येणार नाही, हे स्पष्ट झाले. तसेच आता नव्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाणार असल्यामुळे याचे निकाल पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीसाठीची संभाव्य तारीख ८ नोव्हेंबर होती. त्यामुळे ८ नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होते का, याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान, ८ नोव्हेंबरला सुनावणी होणाऱ्या प्रकरणांची यादी मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाली. यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचा समावेश नाही. त्यामुळे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी आता होणार नाही आणि निकालही येणार नाही हे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, फेब्रुवारी २०२३ मध्ये हे प्रकरण ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले होते. ऑगस्ट २०२४ मध्ये यावर शेवटची सुनावणी झाली. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात या सुनावणीच्या तारखा पडत आहेत. मात्र सुनावणी झाली नाही. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. मात्र ९ आणि १० नोव्हेंबरला शनिवार, रविवार असल्यामुळे न्यायालयाला सुट्टी असते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरन्यायाधीशांच्या कामाचा ८ नोव्हेंबर हाच शेवटचा दिवस असेल. सरन्यायाधीशांसमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण दीर्घकाळ चालले आहे. ८ नोव्हेंबरला हे प्रकरण सुनावणीच्या यादीत नसल्यामुळे आता सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाचा निकाल येणार नाही, हे स्पष्ट झाले असून नव्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात येईल.
या प्रकरणाबाबत 'पुढारी'शी बोलताना सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणासंबंधी याचिका फेब्रुवारी २०२३ मध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शेवटची सुनावणी ऑगस्ट २०२३ मध्ये झाली. पुढे तारखा पडत गेल्या मात्र सुनावणी होऊ शकली नाही. विद्यमान सरन्यायाधीशांसमोर हे प्रकरण दीर्घकाळ चालले आहे. आता मात्र हे प्रकरण एका नव्या खंडपीठाकडे सोपवण्यात येईल. हे खंडपीठ संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा ऐकेल, यासाठी जवळपास तीन ते चार महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे या प्रकरणाच्या निकालाला विलंब लागणार आहे. कदाचित पुढच्या वर्षांत मार्चच्या सुमारास यावर निकाल येऊ शकतो.'
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबद निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.