आशियातील सर्वात स्वच्छ गाव 
राष्ट्रीय

आशियातील सर्वात स्वच्छ गाव

Beautiful village : 'या' गावात प्लास्टिकवरही पूर्णपणे बंदी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. आपल्या देशात अनेकांची वैयक्तिक स्वच्छता बरी असते, पण सार्वजनिक स्वच्छता कशी असते हे कोणत्याही गावातील चौक, रस्ते सांगू शकतात असे एकदा पुलंनी म्हटले होते. आता मात्र देशात सार्वजनिक स्वच्छतेचा गांभिर्याने प्रयत्न सुरू आहे. केंद्र सकारतर्फे देशातील साफसफाई आणि निसर्गाची काळजी घेणार्‍या गावांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानितही केले जाते. भारतात अशी अनेक लहान मोठी गावं आहेत; पण देशात असं एक गाव आहे जे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियात स्वच्छ आणि सुंदर मानले जाते. या गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे. इथं प्लास्टिकवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही तर गावात अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.

या गावाला ‘देवाचा बगीचा’ असेही म्हटले जाते. या गावाचं नाव आहे मॉलिनॉन्ग. मेघालय राज्यातील हे सुंदर गाव पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. मेघालयची राजधानी शिलाँगपासून 78 किलोमीटर अंतरावर ‘मॉलिनॉन्ग’ हे गाव आहे. या गावाला ‘डिस्कव्हर इंडिया’तर्फे 2023 मध्ये आशियातील ‘सर्वात स्वच्छ गावा’चा पुरस्कार मिळाला आहे. या गावाने स्वच्छतेचं काटेकोर पालन केले आहे. ‘मॉलिनॉन्ग’ या गावात खासी जनजातीची लोकं राहातात. ‘मॉलिनॉन्ग’मध्ये साक्षरतेचं प्रमाण 100 टक्के आहे. विशेष म्हणजे या गावात 2007 पासून प्रत्येक घरात शौचालय आहे. इथे कुठेच उघड्यावर शौच केले जात नाही. गावातील कोपर्‍या-कोपर्‍यावर वेतापासून बनवण्यात आलेले कचर्‍याचे डबे ठेवण्यात आले आहेत. झाडांच्या खाली देखील कचर्‍याचे मोठे डबे ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून झाडांवरची सुकलेली पानं या डब्यात पडतील. या गावात शहरासारखे पान खाऊन कोणीही थुंकत नाही किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांचाही वापर होत नाही. इथं शंभर टक्के प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. वातावरण दूषित होऊ नये यासाठी या गावात सिगारेटवरही बंदी आहे. या नियमाचं पालन काटेकोरपणे केले जाते. नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षेचीही तरतुद करण्यात आली आहे. ‘मॉलिनॉन्ग’ या गावाची आणखी एक खासियत म्हणजे हे गाव पूर्णपणे आत्मनिर्भर आहे. गावातील लोकांना बाहेरच्या लोकांवर निर्भर राहावं लागत नाही. शेतीसाठी इथली लोकं स्वत:च खत निर्मिती करतात. कचर्‍यापासून कंपोस्ट खत बनवण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे. शेताजवळ मोठे खड्डे बनवले असून यात गावातील सारा कचरा टाकला जातो, यानंतर यावर प्रक्रिया करून खत बनवलं जातं. लोकं केवळ आपल्या घराचीच साफसफाई करत नाहीत, तर आपल्या घरासमोर रस्ताही दररोज झाडून काढतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT