अदानी यांच्या साम्राज्यात विदेशातून करण्यात आलेल्या गुंतवणुकीत सेबीच्या अध्यक्षा माधुरी पुरी बूच यांचाही सहभाग असल्याचा गौप्यस्फोट हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. File Photo
राष्ट्रीय

Madhabi Puri Buch | 'दुर्भावनापूर्ण, खोडसळ आणि दिशाभूल करणारे...', अदानी समूहानेही हिंडेनबर्गचे आरोप फेटाळले

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालात भारतीय शेअर बाजार नियामक सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या नव्या गौप्यस्फोटामुळे आगामी काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे, असे देखील हिंडेनबर्गने एक्स अकाऊंटवरीस पोस्टमध्ये म्हटले आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी (दि.१० ऑगस्ट) रात्री उशिरा नवीन अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये म्हटले आहे की, बूच दांम्पत्याने कथित अदानी मनी गैरव्यवहार घोटाळ्यात वापरल्या जाणाऱ्या अस्पष्ट ऑफशोअर फंडात भाग घेतला होता. मात्र, या जोडप्याने यापूर्वीच हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. आता अदानी समूहानेही एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, हिंडेनबर्गने केलेले नवीन आरोप दुर्भावनापूर्ण, खोडकर आणि दिशाभूल करण्याच्या हेतूने असल्याचे अदानी समुहाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

हिंडेनबर्ग अहवालातील आरोप दुर्भावनापूर्ण

अदानी समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'हिंडेनबर्ग यांनी केलेले नवीन आरोप हे दुर्भावनापूर्ण आहेत. "यासाठी हिंडेनबर्ग फर्मने, चुकीच्या हेतूने, सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीमधून दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने निवड केली आहे. तथ्ये आणि कायद्यांकडे दुर्लक्ष केले आहे आणि वैयक्तिक लाभ मिळविण्यासाठी पूर्व-निर्धारित निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे." असे देखील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

'हिंडेनबर्ग'मधील आरोप खोट्या दाव्यांचा पुनर्वापर; अदानी समूह

पुढे अदानी समूहाने निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही अदानी समूहावर केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावत आहोत. हे आरोप खोट्या दाव्यांचा पुनर्वापर आहे. ज्यांची कसून चौकशी केली गेली आणि ते निराधार असल्याचे सिद्ध झाले. हे आरोप सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी जानेवारीतच फेटाळले आहेत, असे देखील समूहाने निवेदनात स्पष्ट केले आहे.

बूच दांम्पत्यांकडून आरोपांचे जोरदार खंडन

माधबी पुरी बूच आणि त्यांचे पती धवल यांनी हिंडेनबर्ग अहवालावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शनिवारी 10 ऑगस्ट 2024 च्या हिंडनबर्ग अहवालात आमच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांच्या संदर्भात, आम्ही हे सांगू इच्छितो की, आम्ही अहवालात केलेल्या निराधार आरोपांचे जोरदार खंडन करत आहोत. यातील कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही, असे देखील बूच दांम्पत्यांनी स्पष्ट केले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालात नेमकं काय आहे?

हिंडेनबर्गने (Hindenburg Research) आपल्या नव्या म्हटले आहे की, अदानी समूहासंदर्भातील आमच्या मूळ अहवालाला जवळपास १८ महिने उलटून गेले आहेत. भारतीय व्यावसायिक समूह (अदानी) कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यात सामील असल्याचे भरपूर पुरावे सादर केले गेले आहेत. तथापि, ठोस पुरावे आणि 40 हून अधिक स्वतंत्र मीडिया तपास असूनही, SEBI ने अदानी समूहाविरुद्ध जबरदस्ती कारवाई केली नाही. कारवाई करण्याऐवजी, SEBI ने आम्हाला जून 2024 मध्ये स्पष्ट 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली.

समूहाविरोधात पुरावे देऊनही SEBI कडून कारवाई नाही

मॉरिशसमधील अदानी समूहाच्या काळ्या पैशाच्या नेटवर्कची संपूर्ण माहिती देऊनही कारवाई होत नाही. गुप्त दस्तऐवजांचा हवाला देत, हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले होते की, सेबीच्या अध्यक्षा आणि त्यांच्या पतीचे अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये भागीदारी आहे. या संस्था अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी चालवतात, असे देखील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT