पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील अनेक शाळांना (Delhi schools) बुधवारी बॉम्बच्या धमकीचे (bomb threat) २३ ईमेल मिळाले होते. हे ईमेल एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पाठवले असल्याचे चौकशीत आढळून आले होते. तशी कबुली सदर विद्यार्थ्याने दिली आहे. या प्रकरणी चौकशीदरम्यान बारावीतील विद्यार्थ्याने कबूल केले की, त्याने यापूर्वीही असे धमकीचे ईमेल पाठवले होते, अशी माहिती दिल्लीचे पोलिस उपायुक्त अंकित चौहान यांनी दिली.
शाळांना धमकीचे ईमेल पाठविल्याप्रकरणी दक्षिण जिल्हा पोलिसांनी लाजपत नगरमधील एका प्रतिष्ठित शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्याला अटक केली. त्याने असे का केले? याचे कारणही समोर आले आहे. या विद्यार्थीला परीक्षा रद्द झालेली हवी होती. त्यासाठी तो शाळांना धमकीचे ईमेल पाठवायचा. इतर विद्यार्थ्यांनीही या लिंकद्वारे ईमेल पाठवून परीक्षा रद्द करण्याची विनंती करण्यास सुरुवात केली होती. संशयित आरोपी बीपीएन वापरून मेल पाठवत होता. सदर विद्यार्थ्याने २०२२ पासून आतापर्यंत अनेक शाळांना धमकीचे ईमेल पाठवले असल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
दिल्लीतील शाळांना सतत धमक्या मिळत आहेत. ज्यामुळे शाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक वेळा सुरक्षेच्यादृष्टीने शाळा तातडीने रिकामी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, शाळांना धमकीचे ईमेल पाठवणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेची चिंता वाटत होती. त्याला परीक्षा द्यावी लागू नये यासाठी शाळेला सुट्टी असावी अशी त्याची इच्छा होती.
दक्षिण दिल्ली पोलिसांना विद्यार्थ्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याने हे स्वतःच्या मर्जीने की कोणाच्या सांगण्यावरून केले. सदर विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
८ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११:३८ वाजता दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना धमकीचे ईमेल मिळाले आले होते. यात डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका शाळेचा समावेश होता. शाळेच्या कॅम्पसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे. जर बॉम्बचा स्फोट झाला तर मोठे नुकसान होईल, असा इशारा ईमेलमधून देण्यात आला होता. ईमेल पाठवणाऱ्याने हे नुकसान टाळण्याच्या बदल्यात ३० हजार डॉलर्सची मागणी केली होती.