Vijay TVK MLAs bribe scandal Pudhari
राष्ट्रीय

Vijay TVK MLAs bribe scandal : थलपती विजय यांचे सरकार २ महिन्यांतच पाडण्याचा कट? 'डर्टी गेम'चा पर्दाफाश कसा झाला?

१५ आमदारांना ३५ ते ५० कोटींचे आमिष दाखविल्‍याचा मंत्री निर्मल कुमार यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Vijay TVK MLAs bribe scandal : दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील गुप्तचर विभागाने (Intelligence Department) एका मोठ्या राजकीय कटाचा पर्दाफाश केला आहे. या कटानुसार, अभिनेते ते नेते बनलेल्या थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाचे नवे कोरे सरकार पाडण्याचा प्लॅन होता. विशेष म्हणजे या सरकारला स्थापन होऊन अजून दोन महिनेही पूर्ण झालेले नाहीत. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, TVK च्या १५ आमदारांना एकाच वेळी राजीनामा द्यायला लावून सरकार अल्पमतात आणणे आणि ते पाडणे, असा या कटाचा मुख्य उद्देश होता.

आमदार एन. इलैयाराजा यांची पोलिसांत तक्रार

उथंगरई येथील TVK आमदार एन. इलैयाराजा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा खळबळजनक खुलासा झाला. विधानसभा अध्यक्ष जेसीडी प्रभाकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी एका कन्सल्टन्सी फर्मच्या (IPDS) व्यक्तीने आपल्याला ३५ कोटी रुपयांची मोठी लाच देऊ केल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. इतकेच नाही तर तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांना धमकावण्यातही आले होते. ही बातमी समोर आल्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सेंथिल बालाजी आणि 'करूर गँग'चे नाव आले समोर

या हाय-प्रोफाइल प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांचे धागेदोरे डीएमके (DMK) सरकारचे माजी मंत्री आणि आमदार सेंथिल बालाजी आणि त्यांचा भाऊ अशोक यांच्याशी जुळलेले असल्याचा दावा केला जात आहे. TVK आमदाराच्या तक्रारीवरून कारवाई करत अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि IPDS कन्सल्टन्सी फर्मच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना डीएमके आमदार सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित धागेदोरे मिळाले. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. 'एनडीटीव्ही'च्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांपैकी एक जण सेंथिल बालाजी आणि त्यांच्या भावाचा अत्यंत जवळचा आहे.

मोठ्या नेटवर्कचा तपास सुरू

या प्रकरणावर TVK सरकारचे मंत्री सीटी निर्मल कुमार यांनी थेट हल्लाबोल केला आहे. या कटात 'करूर गँग'चे लोक थेट सामील असल्याचा आरोप त्यांनी केला असून डीएमकेवर निशाणा साधला आहे. कुमार म्हणाले, "सेंथिल बालाजी यांच्याशी थेट संबंधित असलेले आणि तथाकथित 'करूर गँग'चे लोक या प्रकरणात थेट गुंतलेले आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून यात सामील असलेल्या सर्वांना अटक करावी.

५० कोटींपर्यंतची ऑफर, गंभीर आरोप

मंत्री निर्मल कुमार यांनी आरोप केला आहे की, डीएमके नेते एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी यांच्या सांगण्यावरून सेंथिल बालाजी आमदारांशी संपर्क साधत आहेत आणि त्यांना १० कोटींपासून ते ५० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. डीएमके आणि एआयएडीएमके (AIADMK) प्रमुख एडप्पादी के. पलानीस्वामी हे दोघे मिळून विजय यांचे सरकार पाडण्यासाठी 'मागच्या दाराने' प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

'हिंमत असेल तर अटक करून दाखवा' : द्रमुकचे आव्‍हान

या गंभीर आरोपानंतर डीएमकेने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. डीएमकेचे प्रवक्ते ए. सरवणन म्हणाले की, TVK सरकारकडे कोणताही ठोस पुरावा नाही. जर पुरावे असतील तर सेंथिल बालाजी यांना अटक करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी विजय सरकारला दिले आहे. दरम्यान, थलपती विजय आणि सेंथिल बालाजी यांच्यातील संबंध आधीपासूनच ताणलेले आहेत. डीएमकेचे माजी मंत्री करूरचे रहिवासी आहेत आणि विजय यांच्या एका निवडणूक रॅलीदरम्यान तिथे चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी विजय यांनी बालाजींवर आपल्याला बदनाम करण्यासाठी चेंगराचेंगरी घडवून आणल्याचा कट रचल्याचा आरोप केला होता, मात्र बालाजी यांनी हा आरोप फेटाळला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT