Tamil Nadu CM Vijay file photo
राष्ट्रीय

Tamil Nadu CM Vijay: शपथ घेतानाच विजय यांनी केली मोठी चूक; राज्यपाल ओरडले, नेमकं काय झालं?

सी. जोसेफ विजय यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यात एक अनपेक्षित प्रकार घडला.

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu CM Vijay

चेन्नई: तमिळनाडूच्या राजकारणात आज एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. सी. जोसेफ विजय यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यात एक शपथ घेताना विजय यांच्याकडून चूक झाली. समर्थकांचा प्रचंड उत्साह पाहून भारावलेल्या विजय यांनी शपथ घेण्याऐवजी मंचावरून थेट भाषणाला सुरुवात केली. यावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना तत्काळ थांबवले आणि प्रोटोकॉलची आठवण करून दिली.

आज सकाळी राजभवनात आयोजित शपथविधी सोहळ्यात जेव्हा विजय यांचे नाव पुकारण्यात आले, तेव्हा उपस्थित समर्थकांनी मोठा जल्लोष केला. समर्थकांच्या या प्रतिसादाने भारावलेले विजय प्रोटोकॉल विसरले. त्यांनी विहित नमुन्यातील शपथ वाचण्याऐवजी समर्थकांशी संवाद साधत राजकीय भाषण सुरू केले.

हे पाहून राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना मध्येच थांबवले. "आधी शपथ घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा, जे लिहून दिले आहे तेवढेच वाचा," अशा कडक शब्दांत राज्यपालांनी त्यांना समज दिली. राज्यपालांनी सांगितल्यानंतर विजय यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी काही काळ ओशाळल्यागत होऊन पुन्हा रीतसर शपथ वाचनास सुरुवात केली.

या घटनेवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, विजय यांचा चित्रपट क्षेत्रातील वावर आणि प्रशासकीय अनुभवाची कमतरता यामुळे ही चूक झाली असावी. विजय यांचा बॅकग्राउंड सिनेसृष्टीतील आहे. शपथविधीचे नियम आणि शिष्टाचार काय असतात, याबद्दल कदाचित त्यांच्या टीमने त्यांना पुरेशी माहिती दिली नसावी. राज्यपालांनी सांगितल्यानंतर ते काहीसे अस्वस्थ दिसले. तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यासारखे दिग्गज सिने कलाकार मुख्यमंत्री झाले, पण त्यांच्याकडून अशी चूक कधी झाली नाही. भविष्यात अशा चुका विजय यांच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

वंदे मातरमचे गायन, विजयने भाजपलाही मागे टाकले

केद्र सरकारने 'वंदे मातरम' या गीताची संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करणे अनिवार्य केले आहे. विजयच्या शपथविधी समारंभात राष्ट्रगीतापूर्वी हे गीत पूर्ण स्वरूपात वाजवण्यात आले. विशेष म्हणजे, या गीताचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात गायन करण्यात आले नाही. त्यावेळी कोलकाता येथील 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर झालेल्या या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT