Jammu Kashmir High alert | जम्मू-काश्मिरात दहशतवादी आयईडी हल्ल्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर  Pudhari File photo
राष्ट्रीय

Jammu-Kashmir High alert | जम्मू-काश्मिरात दहशतवादी आयईडी हल्ल्याच्या तयारीत; सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

संपूर्ण प्रदेशात कडक सुरक्षा

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. केंद्राच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाईस) चा वापर करून सुरक्षा दलांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

गुप्तचर अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महत्त्वाचा मेसेज इंटरसेप्ट केल्याच्या आधारे दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सर्व सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनावश्यक हालचाली टाळाव्यात, केवळ बुलेटप्रूफ वाहनांमधूनच प्रवास करावा, संवेदनशील भागात अतिरिक्त दक्षता घ्यावी, अशा सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांच्या मते, हल्ल्याचा पॅटर्न पूर्वीप्रमाणेच असू शकतो, ज्यामध्ये आयईडी स्फोटानंतर अंदाधुंद गोळीबार केला जातो.

गस्तीसह सुरक्षा व्यवस्थेत वाढ

काश्मीर खोर्‍यात तसेच जम्मू विभागातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, अल्पसंख्याक वस्त्या आणि प्रवासी कामगारांची वस्ती असलेल्या भागांमध्ये पोलिस व अर्धसैनिक दलांची गस्त वाढवण्यात आली आहे. याशिवाय सीमावर्ती भाग आणि राष्ट्रीय महामार्गांवरही विशेष नजर ठेवली जात आहे.

दहशतवादविरोधी कारवाई तीव्र

संशयित भागांमध्ये शोधमोहीम आणि दहशतवादविरोधी कारवाया वाढवण्यात आल्या आहेत. संभाव्य दहशतवादी हालचाली रोखण्यासाठी विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, काही महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची माहिती सार्वजनिक केली जात नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT