Tahawwur Rana 26/11 Mumbai attacks accused
नवी दिल्ली : दिल्लीतील एनआयए विशेष पटियाला हाऊस न्यायालयाने बुधवारी २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी हा निर्णय घेतला. दहशतवादी राणाला या अगोदर न्यायालयाने सुनावलेली न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. त्यामुळे त्याला दूरदृश्यप्रणालीद्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले होते. तसेच दहशतवादी राणाला नवीन वकिलाची नियुक्ती करण्याबाबत त्याच्या भावासोबत चर्चा करण्यासाठी तीन फोन कॉल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली.
सुनावणीवेळी राणाचे वकील पीयूष सचदेवा यांनी आरोपपत्र आणि पुरवणी आरोपपत्रातील कागदपत्रांची छाननी करण्यासाठी अधिक वेळ मागितला. एनआयएने पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सध्या हा खटला कागदपत्रांच्या छाननीच्या टप्प्यावर आहे. दरम्यान, दहशतवादी तहव्वुर राणावर भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत हत्येचा कट रचणे, भारताविरुद्ध कट रचणे आणि दहशतवादी कारवायांचे नियोजन करणे असे आरोप आहेत. एनआयएने मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आणि सध्या अमेरिकेत तुरुंगात असलेल्या हेडलीशी राणाचा संबंध असल्याचा आरोप केला आहे.
नवीन वकिलाच्या नेमणुकीसाठी ३ फोन कॉल करण्याची राणाला परवानगी
दहशतवादी राणाला या महिन्यात त्याच्या भावासोबत ३ फोन कॉल करण्याची परवानगी मिळाली आहे. हे सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील आणि वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जातील. यावेळी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये संभाषण करण्याची मुभा राणाला असेल, असे न्यायालयाने म्हटले. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी, न्यायालयाने राणाचा त्याच्या कुटुंबासाठी नियमित फोनकॉल सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणारा अर्ज निकाली काढला होता. कारण तुरुंग अधिकाऱ्यांनी ही सुविधा नाकारली होती. यापूर्वी, त्याला त्याच्या कुटुंबाला एकच कॉल करण्याची परवानगी देण्यात आली होती.