Jammu Kashmir terrorist killed
राजौरी : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशदवाद्यांचा घुसखोरी करण्याचा दुसरा प्रयत्न लष्कराने उधळला. केरी सेक्टरमधील बारात गाला परिसरात मंगळवारी सकाळी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला लष्कराने ठार केले. हे तीन ते चार दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. सतर्क जवानांनी गोळीबार सुरू करताच इतर दहशतवादी परत पळून गेले. ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह नियंत्रण रेषेजवळच पडला आहे.
सकाळी ८ ते ९ च्या सुमारास भारतीय लष्कराला बारात गाला परिसरात नियंत्रण रेषेपलीकडून काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच सतर्क जवानांनी गोळीबार सुरू केला. पाकिस्तानी लष्कराने सायंकाळी ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह उचलण्याचा प्रयत्न केला, पण जवानांनी गोळीबार करून तो प्रयत्नही हाणून पाडला. मृतदेह नियंत्रण रेषेवरच (झिरो लाईन) पडून आहे.
दहशतवाद्यांची घुसखोरी उधळून लावल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घालून मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. परिसरात कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ लष्कराला माहिती द्यावी, असे आवाहन लष्कराने स्थानिक नागरिकांना केले आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर या भागात घुसखोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. सूत्रांनुसार, याच परिसरात १५ जूनच्या मध्यरात्री पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही सतर्क जवानांनी तो प्रयत्न हाणून पाडला होता.