कोलकाता; वृत्तसंस्था : नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून देशभर गदारोळ माजलेला असतानाच आता या आंदोलनात दहशतवादीही घुसखोरी करणार होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आंदोलनात पोलिस बनून घुसखोरी करून गोंधळ माजवायचा दहशतवाद्यांचा डाव होता, असा धडकी भरवणारा खुलासा कोलकात्यात पकडला गेलेला जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संशयित दहशतवादी हमीम मंडल आणि त्याची मैत्रीण अर्पिता सरकार यांच्या चौकशीतून पुढे आला आहे.
‘जैश’चा सदस्य असल्याच्या संशयातून हमीम मंडल याला दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील वर्धमान शहरातील पॉश हाऊसिंग कॉलनीतून तर त्याची मैत्रीण अर्पिता सरकार हिला छत्तीसगडमधून ताब्यात घेण्यात आले होते. प. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी रक्षकांच्या गराड्यात कोणत्या क्षणी नसतात, याची माहिती काढण्याची जबाबदारी संघटनेने हमीमवर सोपवलेली होती. तसेच काही राजकीय नेत्यांची खासगी व गोपनीय माहिती मिळवण्यासह त्यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून मोठा पैसा उकळायचा, असाही हमीम व अर्पिता यांचा डाव होता. याच्या तयारीत असतानाच हे दोघे पकडले गेले. अर्पिताला अटकेनंतर प. बंगालला आणण्यात आले. तेथे दोघांचीही चौकशी करण्यात आली. यातून धक्कादायक खुलासे समोर आले.
वडीलही फरार
हमीम मंडलचे वडील मोईनुद्दीन मुलगा एसटीएफच्या जाळ्यात अडकल्यापासून फरार आहे. तोही पिलखाना येथे मुलासोबत राहायचा. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीम खूप कमी बोलायचा. पिलखानात राहताना तो लोकांशी खूप कमी संवाद साधायचा. त्याचे वडील मात्र कधी कधी स्थानिकांशी बोलायचे.
* हमीमचे पिलखाना येथील आलम मिस्त्री लेनच्या अरुंद गल्लीत कपडे शिवण्याचे दुकान आहे. अल्पसंख्याक वस्तीत असलेल्या या दुकानात कपड्यांचे टॅग बनवणे, शिवणकाम यासारखी छोटी-मोठी कामे केली जात. येथे कपडे शिवण्याच्या बहाण्याने तो दहशतवाद्यांशी संपर्क साधायचा. दुकान उघडल्यानंतर हमीम आधी कोलकात्याच्या उत्तर वेशीवरील न्यू टाऊन येथे व नंतर वर्धमान शहरात राहायला गेला, असे पोलिसांनी सांगितले.