terrorist attack Jammu Kashmir
जम्मू-काश्मिरमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद file photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मिरमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे.

राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी सोमवारी रात्री ७:४५ वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त घेराव आणि शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली.

२४ तासांपूर्वी ३ दहशतवाद्यांचा केला होता खात्मा

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे २४ तासांपूर्वी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत ठार झालेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच सतर्क पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला.

दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी रियासी येथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे बस खड्ड्यात पडून नऊ जणांचा मृत्यू झाला. ९ ते ११ जून दरम्यान दहशतवाद्यांनी चारवेळा हल्ले केले होते.

जितेंद्र सिंह यांच्याकडून शोक व्यक्त

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'माझ्या लोकसभा मतदारसंघातील डोडा जिल्ह्यातील डेसा भागात सशस्त्र चकमक झाली. या वृत्ताने अतिशय व्यथित झालो आहे. आपल्या शूरवीरांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन शत्रूच्या नापाक योजनांना पराभूत करूया,' असे जितेंद्र सिंह यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे.

ऑपरेशन धनुषला मोठे यश मिळाले

जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. सोमवारी पत्रकार परिषदेत २६८ ब्रिगेड केरन सेक्टरचे कमांडर बीटीआयजी एनएल कुर्कर्णी म्हणाले की, ऑपरेशन धनुष हे महत्त्वपूर्ण यश आहे. यामध्ये कुपवाडा पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांनी केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडला. या कारवाईत तीन एके-४७ रायफल, चार पिस्तूल आणि सहा हातबॉम्बसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय पाक चिन्हांकित सिगारेट आणि खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

कठुआमध्ये पाच जवानांचे बलिदान

जुलैच्या सुरुवातीला ८ जुलै रोजी कठुआच्या बडनोटा भागात सशस्त्र दहशतवाद्यांच्या एका गटाने लष्कराच्या गस्तीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.

SCROLL FOR NEXT