श्रीनगर : पुढारी ऑनलाईन
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केल्याची घटना घडली आहे. रविवार रात्री गांदरबल मधील सोनमर्ग मध्ये दहशतवाद्यांनी बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये डॉक्टरसहीत ७ कामगारांचा मृत्यू झाला. (terror attack)
या दहशतवादी हल्ल्यामध्ये ५ कामगार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी श्रीनगर येथील शेर-ए-कश्मीर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) येथे दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्गमध्ये झाला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षादलाने जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून शोध मोहीम सुरू केली आहे.
या हल्ल्यामध्ये सहा लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला रात्री ८:३० च्या सुमारास झाला. यावेळी सर्व कर्मचारी जेवण्यासाठी मेसमध्ये जमले होते. येथे उपस्थित असणाऱ्याने सांगितले की, जेंव्हा सर्व कामगार जेवण्यासाठी मेसमध्ये आले तेंव्हा येथे तीन दहशतवादी आले. यावेळी त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. कोणालाही काही कळण्याच्या आत ते गोळीबार करून येथून फरार झाले. दहशतवाद्यांच्या फायरींगमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमधील गंगांगीर येथील नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांच्या कठोर प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल. या दु:खाच्या प्रसंगी, मी मृतांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.