नवी दिल्ली; पीटीआय : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) जुलै महिन्यात सदस्यसंख्या 21.04 लाखांनी वाढली असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर, नवीन 9 लाख 79 हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे. यात 18 ते 25 वयोगटातील सदस्यांचे प्रमाण 61.06 टक्के आहे.
ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2024 च्या तुलनेत यंदा 5.55 टक्क्यांनी कर्मचारीसंख्या वाढली आहे. नवीन सदस्यसंख्या 9 लाख 79 हजारांनी वाढली असून, यात 18 ते 25 वयोगटातील सदस्यांचा भरणा अधिक आहे. या वयोगटातील सदस्यसंख्या 5 लाख 98 हजार आहे. निव्वळ संख्येतील 9 लाख 13 हजार सदस्य 18 ते 25 वयोगटातील आहेत. गतवर्षीच्या तुलनेत त्यात 4.09 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यापूर्वी रोजगार गमावलेले 16 लाख 43 हजार सदस्य जुलै 2025 मध्ये ईपीएफओशी जोडले गेले आहेत. ही संख्याही गतवर्षीपेक्षा 12.12 टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, या सदस्यांनी रोजगार गमावल्यानंतर भविष्य निर्वाह रक्कम काढण्याऐवजी नवीन कंपनीमध्ये पुन्हा खाते सुरू करण्याचा पर्याय निवडला आहे. जुलै महिन्यात ईपीएफओमध्ये 2 लाख 80 हजार नवीन महिला दाखल झाल्या आहेत. तर, जुलै 2024 च्या तुलनेत यंदा महिला सदस्यसंख्या 0.17 टक्क्याने वाढून 4 लाख 42 हजार झाली आहे.