Revanth Reddy | ‘जेन झी’साठी तेलंगणाचा पुढाकार; विधानसभा, लोकसभा लढवण्याचे वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव  
राष्ट्रीय

Revanth Reddy | ‘जेन झी’साठी तेलंगणाचा पुढाकार; विधानसभा, लोकसभा लढवण्याचे वय २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठीचे किमान वय सध्याच्या २५ वर्षांवरून २१ वर्षे करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या प्रस्तावासाठी ते सोमवारी दिल्लीला जाणार असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देणार आहेत.

रविवारी माध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, देशातील 'जनरेशन झी' ला केवळ मतदानाचा अधिकार न देता कायदे करण्याचीही संधी मिळाली पाहिजे. युवकांना संसदेचे आणि विधानसभांचे दरवाजे खुले करण्याचे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. रेवंथ रेड्डी म्हणाले, युवकांचा वाढता सहभाग आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन निवडणूक लढविण्याच्या वयोमर्यादेत बदल करणे आवश्यक आहे. मी हा प्रस्ताव इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर मांडणार आहे. त्यानंतर खासगी विधेयक संसदेत मांडण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

चार मुद्द्यांवर एकत्र चर्चेची मागणी

रेड्डी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की, निवडणूक लढविण्याचे किमान वय कमी करण्याच्या प्रस्तावासह लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना, लोकसभा सदस्यसंख्या वाढविणे आणि महिला आरक्षण विधेयक या चारही महत्त्वाच्या विषयांवर संसदेत एकाच वेळी चर्चा करण्यात यावी. ही चारही प्रकरणे एकत्रितपणे संसदेत चर्चेला घ्या, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

देशात आता ‘जय जवान, जय किसान’ बरोबरच ‘जय युवा’ हा नारा दिला पाहिजे, असे सांगत रेवंथ रेड्डी यांनी युवकांना देशाच्या राजकीय प्रवाहात अधिक मोठी भूमिका देण्याची गरज व्यक्त केली. रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, शिक्षण हा समवर्ती यादीतील विषय असतानाही केंद्राने नीट परीक्षा लागू केली आहे. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि जबाबदारी यावर लोकसभेत सखोल चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

२०२९ च्या निवडणुकीबाबत आत्मविश्वास

रेवंथ रेड्डी यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. "२०२९ हे वर्ष आमचे असेल. दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार, हे भाजप आणि बीआरएस यांनी ठरवावे," असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील विधानसभा, लोकसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील काँग्रेसच्या वाढत्या मताधिक्याचा दाखला देत त्यांनी पक्षाची संघटनात्मक ताकदही अधोरेखित केली.

ऑगस्टमध्ये तेलंगणा विधानमंडळात ठराव

रेवंथ रेड्डी यांनी सांगितले की, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या तेलंगणा विधानमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर हा ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मते, देशासाठी ऑगस्ट महिना ऐतिहासिक ठरू शकतो.

राजीव गांधींनी मतदानाचे वय कमी केले, आता मोदींनी पुढाकार घ्यावा...

रेवंथ रेड्डी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आठवण करून देत सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात मतदानाचे किमान वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले होते. आता जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढविण्याचे किमान वय २१ वर्षे केले, तर त्यांचे नावही या ऐतिहासिक निर्णयामुळे कायम स्मरणात राहील. आवश्यक वाटल्यास हा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीकडे पाठवून सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT