Crime News Pudhari
राष्ट्रीय

Crime News: 'चिकन का केले नाही...' पतीने विचारले, संतापलेल्या पत्नीने विळ्याने वार करून त्याला संपवले

रात्रीच्या जेवणात चिकन का बनवले नाही, यावरून पतीने भांडण सुरू केले. या वादातून संतप्त पत्नीने विळ्याने पतीच्या मानेवर वार करून हत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

तेलंगणा: रात्रीच्या जेवणात चिकन का बनवले नाही, यावरून पतीने भांडण सुरू केले. या वादातून संतप्त पत्नीने विळ्याने पतीच्या मानेवर वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री तेलंगणातील कामारेड्डी शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोडंदम शिवाजी (वय २८) हा भंगार विक्रीचा व्यवसाय करायचा. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घरी आल्यावर तो पत्नी लक्ष्मीला चिकन का केले नाही, अस म्हणाला. यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचा आवाज ऐकून जवळच राहणारे त्यांचे नातेवाईकांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत केले. मात्र, नातेवाईक निघून गेल्यानंतर काही वेळातच शिवाजीने पुन्हा वादाला सुरुवात केली.

विळ्याने मानेवर केला वार

जेवणावरून सुरू असलेला हा वाद विकोपाला गेला. यावेळी नातेवाईकांनी पुन्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण वादाचे रूपांतर झटापटीत झाले. संतापलेल्या लक्ष्मीने विळ्याने शिवाजीच्या मानेवर जोरदार वार केला. यात शिवाजी जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती कामारेड्डीचे पोलीस निरीक्षक बी. नरहरी यांनी दिली.

सहा वर्षांचा संसार, दोन मुली

मृत शिवाजीचा मोठा भाऊ सुरी याने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजी आणि लक्ष्मीचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना दोन मुली आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यात वारंवार घरगुती कारणावरून वाद व्हायचे आणि अनेकदा नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण मिटवले होते.

पोलिसांनी रविवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी लक्ष्मीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी लक्ष्मीला अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT