Crime News File Photo
राष्ट्रीय

Crime News: पोक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीचा थरार; पीडितेच्या कुटुंबासह स्वतःच्या पत्नी-मुलांना संपवले, ६ जणांचा बळी

Hyderabad Horror Killing: 'पोक्सो' कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नी आणि दोन चिमुरड्या मुलांसह तब्बल ६ जणांची निर्घृण हत्या केली.

मोहन कारंडे

Hyderabad Horror Killing

हैदराबाद: 'पोक्सो' कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नी आणि दोन चिमुरड्या मुलांसह तब्बल ६ जणांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केलेल्या अल्पवयीन पीडितेचा, तिची आई आणि आजीचा समावेश आहे. शुक्रवारी (दि. १०) रात्री तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात ही अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे.

बदल्याच्या भावनेतून पीडितेच्या घरावर हल्ला

राजू कुमार असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास स्वतःच्या गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शाबाद शहरात कारने गेला. मे महिन्यात ज्या १६ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात छेडछाड आणि पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली होती, तिच्या घरी पोहचला. रात्री १०.४५ च्या सुमारास मुलीच्या ४२ वर्षीय आईने दरवाजा उघडला. यावेळी त्याने तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर घरात घुसून झोपेत असलेल्या ६० वर्षीय आजीची हत्या केली आणि त्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेले. यावेळी, घरात उपस्थित असलेल्या मुलीच्या २० वर्षीय दिव्यांग बहिणीला त्याने कोणताही धक्का लावला नाही.

स्वतःच्या कुटुंबाचाही गळा चिरला

मुलीचे अपहरण केल्यानंतर आरोपीने तिला आपल्या गावातील एका तलावाजवळ नेले. तिथे तिची चाकूने भोसकून हत्या केली आणि मृतदेह तलावाच्या काठावर फेकून दिला. यानंतर रात्री ११.२१ च्या सुमारास तो स्वतःच्या घरी पोहोचला. तिथे गाढ झोपेत असलेल्या आपली ३१ वर्षीय पत्नी, ४ वर्षांचा मोठा मुलगा आणि अवघ्या १८ महिन्यांचा लहान मुलगा या तिघांचा गळा चिरून त्याने अत्यंत क्रूरपणे खून केला. घरात शिरल्यापासून अवघ्या ६ मिनिटांत हा थरार आटोपून तो रात्री ११.२७ वाजता तिथून पसार झाला.

वडिलांना फोन करून दिली माहिती

हे भयंकर हत्याकांड घडवल्यानंतर आरोपीने शाबाद येथे राहणाऱ्या आपल्या वडिलांना फोन केला आणि सर्व कृत्याची माहिती दिली. वडिलांनी तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

जामिनावर बाहेर होता आरोपी; पोलिसांकडून शोध सुरू

मे महिन्यात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. जून महिन्यात स्थानिक न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. हा गुन्हा ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेचा असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडून दिले होते. "आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पीडित मुलगी, तिचे कुटुंब आणि स्वतःच्या निष्पाप कुटुंबाला संपवण्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस आयुक्त तरुण जोशी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT