हैद्राबाद : तेलंगणात कुत्रामुक्त गाव करण्याच्या नावाखाली राज्यातील सहा जिल्ह्यांमधील 12 हून अधिक गावांमध्ये अक्षरशः कुत्र्यांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 1600 हून अधिक भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
डिसेंबरमध्ये झालेल्या सरपंच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी गावे कुत्र्यांपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी आंध्र प्रदेशातून खास डॉग कॅचर्सला बोलावून, प्रत्येक कुत्र्यामागे 500 रुपये देऊन त्यांना विषारी इंजेक्शनद्वारे मारण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या क्रूर मोहिमेची व्याप्ती हनुमानकोंडा, कामारेड्डी, जगित्याल, रंगारेड्डी आणि निर्मल या जिल्ह्यांमध्ये दिसून आली आहे.
गावाबाहेर कुत्र्यांना दफन करण्यासाठी सामूहिक खड्डे सापडल्यानंतर या प्रकाराचा पर्दाफाश झाला. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 ते जुलै 2025 या काळात राज्यात 14.88 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थ त्रस्त होते आणि याचाच फायदा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.