नवी दिल्ली : कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी (दि.११) लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव, हेमा यादव आणि इतरांना जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेच्या जामीनावर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी होणार आहे.
यापूर्वी २५ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी सीबीआयने दाखल केलेल्या अंतिम आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने सर्व आरोपींना समन्स पाठवले होते. तिघांनाही ११ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी तेज प्रताप यादव, हेमा यादव आणि इतर न्यायालयात हजर झाले होते. या प्रकरणात सीबीआयने लालू प्रसाद यादव आणि इतर ७८ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपपत्रात ३० सरकारी कर्मचाऱ्यांवर आरोप आहेत. सीबीआयने म्हटले होते की, 'रेल्वे बोर्डाचे अधिकारी आरके महाजन यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी आम्ही न्यायालयाकडून परवानगी घेतली आहे. त्यांच्याविरुद्धच्या साक्षीदारांची यादीही तयार आहे. या प्रकरणात न्यायालय पुढील निर्णय घेईल.
सदर प्रकरणात, २० जानेवारी २०२४ रोजी ईडीच्या दिल्ली आणि पाटणा पथकांच्या अधिकाऱ्यांनी लालू आणि तेजस्वी यादव यांची १० तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांना ५० हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यांनी बहुतेकदा हो किंवा नाही मध्ये उत्तर दिले. तर, ३० जानेवारी रोजी तेजस्वी यादव यांची सुमारे १०-११ तास चौकशी करण्यात आली होती.