TCS layoffs file photo
राष्ट्रीय

TCS layoffs: आयटी क्षेत्र हादरले! टीसीएसने एका झटक्यात २० हजार कर्मचाऱ्यांची कपात का केली?

भारतातील सर्वात मोठी आयटी निर्यातदार कंपनी आणि खासगी क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार देणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात केली आहे.

मोहन कारंडे

TCS layoffs

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी आयटी निर्यातदार कंपनी आणि खासगी क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार देणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात केली आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) चा वाढता प्रभाव आणि अमेरिका-भारत व्यापार संबंधांतील तणाव यामुळे देशातील २८० अब्ज डॉलरच्या तंत्रज्ञान उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.

दोन वर्षांत प्रथमच ६ लाखांच्या खाली कर्मचारी संख्या

गेल्या दोन वर्षांत प्रथमच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ची कर्मचारी संख्या ६,००,००० च्या खाली आली आहे. हा आकडा भारतातील या आउटसोर्सिंग पॉवरहाऊससाठी एक मोठा टर्निंग पॉईंट आहे. ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत, TCS ने केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत १९,७५५ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीच्या ताज्या तिमाही अहवालानुसार, ही कपात मागील तिमाहीच्या तुलनेत ३.२ टक्के घट दर्शवते, ज्यात स्वेच्छानिवृत्ती आणि नोकरकपात दोन्हीचा समावेश आहे. कंपनीने नोकरीतून काढून टाकण्याशी संबंधित खर्च भागवण्यासाठी १,१३५ कोटी बाजूला ठेवले आहेत.

मध्यम आणि वरिष्ठ स्तरावर मोठी कपात

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मुख्य एचआर (CHRO) सुदीप कुन्नुमल यांनी सांगितले की, सध्याची पुनर्रचना प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील भूमिकांवर केंद्रित आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, 'कौशल्ये आणि क्षमतेतील तफावत' हे यामागचे मुख्य कारण आहे. TCS ने मार्च २०२६ पर्यंत जागतिक कर्मचाऱ्यांपैकी २ टक्के कपात करण्याची योजना आखली आहे आणि कंपनी त्या दिशेने निम्मा टप्पा पूर्ण करत आहे. AI आणि ऑटोमेशन-आधारित सेवांकडे कंपनीचे लक्ष वळवण्यासाठी उचलेले हे पाऊल आहे.

जागतिक मागणीतील कमतरतेमुळे गुंतवणूकदार चिंतेत

सिटी (Citi) येथील विश्लेषकांनी नमूद केले की, ही नोकरकपात मंद व्यावसायिक दृष्टिकोन दर्शवते. जागतिक मागणीतील कमतरता आणि तंत्रज्ञान बजेटमधील कपात यामुळे हा निर्णय घेण्यात आला. नोकरकपातीमुळे आलेल्या एकवेळच्या खर्चांमुळे टीसीएसचा तिमाही नफा अपेक्षेपेक्षा कमी आला. विश्लेषकांच्या मते, या कपातीमुळे भारतातील सर्वात स्थिर तंत्रज्ञान कंपनीलाही बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेची झळ जाणवत आहे.

अमेरिकेच्या धोरणात्मक आव्हानांचा अतिरिक्त दबाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्क सुमारे ८८.७ लाख रूपयांपर्यंत वाढवण्याच्या आणि भारतीय आयातीवर अधिक शुल्क लावल्यामुळे भारतीय आयटी क्षेत्रातील अनिश्चितता वाढली आहे. टीसीएसवर थेट शुल्काचा परिणाम मर्यादित असला तरी, धोरणात्मक अनिश्चितता आणि अमेरिकेतील ग्राहकांकडून आयटी खर्चात होणारी कपात ही गंभीर चिंता आहे.

भविष्यासाठी 'टी.सी.एस.'चा बदल

टीसीएस आता परदेशी व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर अधिक नोकऱ्या देत आहे. कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या भविष्यासाठी उपयुक्त कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

मोठ्या प्रमाणावर माणसं ठेवण्यापेक्षा स्मार्ट टेक मॉडेलवर भर देण्याचा हा बदल केवळ टीसीएसपुरता मर्यादित राहणार नाही. पुढील काही वर्षांत संपूर्ण भारतीय IT क्षेत्रात याचा प्रभाव दिसू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT