Thalapathy Vijay  Pudhari
राष्ट्रीय

TVK Vijay Government| तमिळनाडूतील 'सत्तानाट्यात' नवा ट्विस्ट, 'टीव्हीके'ला पाठिंबा देण्‍यासाठी AIADMK मध्ये बंडाचे वारे!

TVK Vijay Government| काँग्रेसच्‍या बैठकीत TVK ला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

TVK Vijay Government

चेन्‍नई : अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत TVK हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला, तरी बहुमताच्या आकड्यापासून तो केवळ १० जागा दूर आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी TVK आता काँग्रेस, पीएमके (PMK), डावे पक्ष, सीपीएम (CPM) आणि व्हीसीके (VCK) सारख्या छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. TVK प्रमुख विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.

काँग्रेसच्‍या बैठकीत TVK ला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब

'पीटीआय'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळनाडू काँग्रेसने राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या (PAC) तातडीच्या बैठकीत विजय यांच्या TVK ला पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.तमिळनाडूचे काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर यांनी ही बैठक बोलावली होती. 'झूम' कॉलद्वारे झालेल्या या बैठकीत बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी विजय यांना पाठिंबा देण्याचे मत व्यक्त केले. सूत्रांनी सांगितले की, "तमिळनाडूमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीके नेते विजय यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे."

भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्‍यासाठी काँग्रेसचा निर्णय

यापूर्वी काँग्रेसने स्पष्ट केले होते की, विजय यांनी पाठिंब्यासाठी संपर्क साधला असून, हायकमांडने स्थानिक भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसने ही निवडणूक डीएमके (DMK) सोबत युती करून लढवली होती. "भाजप किंवा त्यांच्या प्रतिनिधींना कोणत्याही प्रकारे तमिळनाडूच्या सत्तेत स्थान मिळू नये," अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

द्रमुककडून काँग्रेसवर 'विश्वासघाता'चा आरोप

काँग्रेस आणि TVK जवळ येत असल्याचे पाहून 'धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडी'मध्ये ) तणाव निर्माण झाला आहे. डीएमकेने काँग्रेसवर कडक शब्दांत टीका करत त्यांना 'पाठित खंजीर खुपसणारा' म्हटले आहे. डीएमके प्रवक्ते सरवणन अण्णादुराई म्हणाले, "काँग्रेसने घेतलेला हा निर्णय अत्यंत संकुचित आहे, त्यांना भविष्यात या निर्णयाचा पश्चात्ताप होईल. २०२९ च्या निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसने अशा प्रकारे अस्थिरता निर्माण केली आहे. यामुळे 'काँग्रेसवर विश्वास ठेवता येत नाही' असा संदेश देशभरात गेला आहे."

AIADMK मध्ये बंडाचे वारे, मोठा गट विजय यांना पाठिंबा देणार?

दुसरीकडे, अण्‍णाद्रमुक (AIADMK) पक्षात अंतर्गत खळबळ उडाली आहे. पक्षातील एक मोठा गट विजय यांच्या TVK ला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याची चर्चा तामिळनाडूच्‍या राजकीत वर्तुळात आहे. हे आमदार एडापड्डी पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर नाराज असून, त्यांनी विजय यांना साथ देण्याची मागणी नेतृत्वाकडे लावून धरली आहे. २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. विजय यांच्या TVK कडे सध्या १०८ जागा असून बहुमतासाठी केवळ १० जागा कमी आहेत.

TVK चे आमदार मल्लापुरममध्ये

सत्तास्थापनेचा पेच सुटेपर्यंत TVK ने आपल्या १०८ नवनिर्वाचित आमदारांना खबरदारीचा उपाय म्हणून मल्लापुरम येथील एका आलिशान खासगी रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. विजय यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सर्व आमदारांना या रिसॉर्टवर नेण्यात आले. सुरक्षिततेसाठी रिसॉर्टबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पाळत वाढवण्यात आली आहे. सध्या ५० हून अधिक आमदार 'फोर पॉइंट्स स्टार' हॉटेलमध्ये असून, उर्वरित आमदारही लवकरच तेथे पोहोचतील, असेही पक्षाच्‍या सूत्रांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT