चेन्नई; वृत्तसंस्था : ‘दित्वा’ चक्रीवादळामुळे उद्भवणार्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना केल्या आहेत. शनिवारी संध्याकाळी शहर आणि त्याच्या शेजारील भागात मुसळधार पाऊस पडला. सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये 50 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. राज्यात 6,000 हून अधिक मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
राज्याचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री केकेएसएसआर रामचंद्रन म्हणाले की, सरकार युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांसह सुमारे 28 आपत्ती प्रतिसाद पथके सज्ज आहेत. आम्ही इतर राज्यांमधून आणखी 10 पथके विमानाने आणण्याची योजना आखली आहे. हवाई दल आणि तटरक्षक दलालाही सतर्क करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, उद्या जिल्ह्यांमध्ये देखरेख पथके पाठवली जातील, असे मंत्री ‘पीटीआय’ला म्हणाले. आतापर्यंत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, परंतु, 16 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
24 झोपड्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे आतापर्यंत कोणताही मोठा परिणाम झालेला नाही. तथापि, राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि बचाव आणि मदत कार्यासाठी पथके तयार ठेवली आहेत, असे ते पुढे म्हणाले. एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विल्लुपूरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, नागापट्टिनम, तिरुवरुर, तंजावर, पुडुकोट्टई आणि मयिलादुथुराई या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 14 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. पुद्दुचेरी आणि चेन्नईसाठी अतिरिक्त तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.