Tamil Nadu election Tiruppattur constituency result KR Periyakaruppan defeat file photo
राष्ट्रीय

Tamil Nadu election result: एका मताने पराभव; तामिळनाडूच्या मंत्र्याला मोठा धक्का, विजयच्या 'टीव्हीके'ने चारली धूळ

लोकशाहीमध्ये एका मताचे महत्त्व किती असते, याचा प्रत्यय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आला आहे.

मोहन कारंडे

Tamil Nadu election result 2026

चेन्नई: लोकशाहीमध्ये एका मताचे महत्त्व किती असते, याचा प्रत्यय तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आला आहे. तामिळनाडूचे सहकार मंत्री आणि DMK चे ज्येष्ठ नेते के. आर. पीरियाकरुप्पन यांचा तिरुप्पत्तूर मतदारसंघातून केवळ एका मताने धक्कादायक पराभव झाला आहे. अभिनेता थलपती विजयच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे उमेदवार सीनिवास सेथुपति यांनी त्यांचा पराभव करत विजय मिळवला आहे.

अंतिम फेरीपर्यंत उत्कंठा, एका मताने फिरवले नशीब

हा सामना अत्यंत थरारक झाला. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत पीरियाकरुप्पन हे ३० मतांनी आघाडीवर होते. मात्र, अंतिम फेरीत समीकरण पूर्णपणे बदलले. केवळ एका मतामुळे पीरियाकरुप्पन यांची सलग पाचव्यांदा आमदार होण्याची संधी हुकली आहे. तिरुप्पत्तूरमध्ये त्यांच्या विरूद्ध असलेले टीव्हीकेचे सीनिवास सेथुपति यांना ८३,३७५ मते मिळाली. तर, पीरियाकरुप्पन यांना ८३,३७४ मते मिळाली.

२,००० मतदारांचा मतदानावर बहिष्कार; मंत्र्यांना पडला महागात

या निकालामागे स्थानिक संताप हे मोठे कारण मानले जात आहे. तिरुप्पत्तूर मतदारसंघातील आर. पलकुरिची पंचायतीमधील सुमारे २,००० पेक्षा जास्त मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. प्रशासकीय सीमा वादाचा प्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक होते. जर या मतदारांनी मतदान केले असते, तर निकालाचे चित्र वेगळे असते. या बहिष्काराचा थेट फटका सत्ताधारी मंत्र्यांना बसला.

पीरियाकरुप्पन यांचा राजकीय प्रवास

के.आर. पीरियाकरुप्पन हे DMK मधील मोठे नाव मानले जाते. २००६ पासून ते सलग चार वेळा तिरुप्पत्तूरमधून निवडून आले होते. २०२१ मध्ये DMK सत्ता आल्यावर त्यांना ग्रामीण विकास मंत्री करण्यात आले. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. यापूर्वी त्यांनी मानव संसाधन आणि मंदिर प्रशासन मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

DMK छावणीत शांतता, TVK मध्ये जल्लोष

पीरियाकरुप्पन यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा अवघ्या एका मताने पराभव झाल्यामुळे DMK कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. दुसरीकडे, टीव्हीके समर्थकांनी हा मोठा राजकीय बदल असल्याचे सांगत जल्लोष केला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल पूर्णपणे पारदर्शक असल्याचे स्पष्ट केले असून, या एका मताच्या फरकाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT