Tamil Nadu CM Vijay Pudhari
राष्ट्रीय

Tamil Nadu CM Joseph Vijay : महिला सुरक्षा 'सर्वोच्‍च' ! तामिळनाडूमध्ये CM जोसेफ विजय यांनी लाँच केले 'ऑल विमेन पोलीस युनिट'

महिलांच्‍या संरक्षणासाठी संपूर्णपणे महिलांची पोलीस तुकडी

पुढारी वृत्तसेवा

Tamil Nadu CM Joseph Vijay : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी 'सिंगाप्पन स्पेशल टास्क फोर्स' (Singappan Special Task Force) लाँच केली आहे. राज्यातील महिलांवरील गुन्हेगारीला आळा घालणे आणि संकटकाळात तातडीने मदत पोहोचवणे हा या फोर्सचा मुख्य उद्देश आहे. या विशेष टास्क फोर्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्णपणे महिलांची पोलीस तुकडी आहे, म्हणूनच याला 'ऑल विमेन पोलीस युनिट' (All Women Police Unit) असेही म्हटले जात आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध

या टास्क फोर्सच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणाले, "हा उपक्रम माझ्या मनाच्या अत्यंत जवळचा आहे. तामिळनाडूतील प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आमचे सरकार किती वचनबद्ध आहे. हे केवळ निवडणूक आश्वासन नव्हते. आम्ही महिलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याची हमी दिली होती; आणि पदभार स्वीकारल्यानंतर काही वेळातच आम्ही 'सिंगाप्पन स्पेशल फोर्स'ची स्थापना करून हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे."

मुख्यमंत्र्यांनी केला तीन महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांचा उल्लेख

टीव्हीके (TVK) प्रमुख आणि मुख्यमंत्री विजय यांनी सांगितले की, "आमचे सरकार तीन प्रमुख गोष्टींना प्राधान्य देणार आहे. पहिले म्हणजे अंमली पदार्थांचे (ड्रग्ज) समूळ उच्चाटन, दुसरे महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि तिसरे म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखणे. तामिळनाडूमधून ड्रग्जचा पूर्णपणे बिमोड झालाच पाहिजे. आपल्याला भूतकाळात अडकून पडण्याची गरज नाही. आपले संपूर्ण लक्ष सुरक्षित भविष्य घडवण्यावर आहे... आम्ही महिलांविरोधातील गुन्हे अजिबात खपवून घेणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल, जी इतरांसाठी एक धडा ठरेल."

'सिंगाप्पन स्पेशल टास्क फोर्स'चे वैशिष्ट्य काय?

तामिळनाडू राज्याच्या विशेष दलाचे नेतृत्व पोलीस महानिरीक्षक (IGP) के. भवानीश्वरी करणार आहेत. राज्यभरातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करणे हे या दलाचे मुख्य उद्दिष्ट असेल. मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी ज्या पहिल्या आदेशांवर स्वाक्षरी केली होती, त्यामध्ये या विशेष दलाच्या स्थापनेचाही समावेश होता.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पोलीस महासंचालक आणि पोलीस दल प्रमुखांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सायबर क्राईम शाखेच्या दोन उपनिरीक्षकांसह (PSI) एकूण १८ उपनिरीक्षकांना ऑन-ड्यूटी (OD) तत्वावर या दलात नियुक्त करण्यात आले आहे.

पोलीस महानिरीक्षकांनी जारी केला आदेश

चेन्नई येथील विशेष दलाच्या पोलीस महानिरीक्षकांच्या पत्रानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित युनिटच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे आणि त्यांना नवीन विशेष दलात रुजू होण्यास सांगावे. या प्रतिनियुक्तीमध्ये (Deputation) डीजीओ कार्यालयाच्या सोशल मीडिया सेलचे कर्मचारी, वडापलानी पोलीस स्टेशनचे एक हेड कॉन्स्टेबल आणि ग्रेटर चेन्नई पोलिसांच्या इंटेलिजन्स विंगचे एक ग्रेड-१ पोलीस कॉन्स्टेबल यांचाही समावेश आहे. हे दोघेही सोशल मीडिया सेलमध्ये कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT