Tamil Nadu Gas Leak : तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये (मत्स्य प्रक्रिया केंद्र) अमोनिया वायूची मोठी गळती झाली आहे. या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक घटनेत ७ महिला कामगारांचा मृत्यू झाला असून, अनेक कामगारांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, किमान ६७ कामगारांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, यातील ७ जणांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
ही दुर्घटना पेरियापालयम जवळील कन्निगापैर गावात असलेल्या 'सेंट पीटर्स अँड पॉल सीफूड्स एक्स्पोर्ट्स' कारखान्यात घडली. गॅस गळती झाल्यानंतर कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली आणि बाधित कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात हलवण्यात आले.या अपघाताचा बळी ठरलेले बहुतांश कामगार हे उत्तर भारतातील विविध राज्यांमधून आलेले स्थलांतरित मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे.
वायूच्या संपर्कात आल्यानंतर अनेकांना श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि उलट्या होणे असा त्रास सुरू झाला. प्राथमिक तपासानुसार, कारखान्यात बसवलेल्या एका मुख्य व्हॉल्व्हमधून हा अमोनिया गॅस लीक झाला. गळतीचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आणि संबंधित विभागांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकारने गॅस गळतीचे कारण शोधण्यासाठी डीन डॉ. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीला घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला असून, कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या इतर काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तिरुवल्लूर जिल्ह्याचे प्रभारी तामिळनाडूचे मंत्री कुमार यांनी तातडीने दोन्ही खाजगी रुग्णालयांना भेट दिली.
तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "कन्निगापैर गावाजवळील कारखान्यात अमोनिया गॅस गळतीमुळे लोकांचा जीव जाणे अत्यंत क्लेशदायक आहे आणि अनेक कामगार जखमी झाल्याची बातमी चिंताजनक आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ईश्वर त्यांना शक्ती आणि धैर्य देवो," असे त्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.