प्रातनिधीक छायाचित्र  File Photo
राष्ट्रीय

रमजान महिन्यात 'रोजे' ठेवताना अशी घ्या आरोग्याची काळजी

Ramadan Mubarak | उद्यापासून रमजान रोजे प्रारंभ

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: Ramadan Mubarak |संपूर्ण भारतभर रविवारपासून (दि.२) चंद्रदर्शनानंतर रमजानला प्रारंभ होत आहे.  रमजान महिना मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असून, या महिन्यात उपवास (रोजे) ठेवण्याची प्रथा आहे. दिवसभर अन्न आणि पाणी न घेता उपवास केला जातो. रमजानमध्ये उपवास ठेवणे म्हणजे शरीर आणि आत्म्याचा शुद्धीकरणाचा काळ असतो. योग्य आहार, पुरेशी झोप आणि शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घेतल्यास रविवारपासून (दि.१) सुरू होणारे रोजे (उपवास) सहज आणि ऊर्जा देणारा ठरेल. चला जाणून घेऊया या काळात आरोग्याची कशी काळजी घ्यावी याविषयी ...

सेहरीमध्ये पोषक आहार घ्या

रोजे सुरू करण्याआधी पहाटे सेहरीमध्ये संतुलित आणि पोषणयुक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारात प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि हळूहळू ऊर्जा मिळणारे कार्बोहायड्रेट्स असावेत. संपूर्ण आहार असलेले पदार्थ (जसे की ओट्स, गहू, ब्राऊन राईस) घेतल्याने पचन प्रक्रिया सुधारते. दुग्धजन्य पदार्थ, अंडी, डाळी यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात. उपवास सुरु हाेण्‍यापूर्वी भरपूर पाणी आणि ताक घेतल्यास दिवसभर पाण्याची कमतरता जाणवत नाही.

दिवसभर हायड्रेटेड राहा

दिवसभर पाणी पिणे शक्य नसल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सेहरी आणि इफ्तारवेळी भरपूर पाणी प्या. साखर नसलेले फळांचे रस, ताक, लिंबूपाणी यांचा समावेश आहारात करा. उष्ण तापमान आणि कडक ऊन असल्यास जास्त वेळ घराबाहेर जाऊ नका. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही, ते टिकून राहील.

इफ्तारमध्ये अति खाणे टाळा

सायंकाळी उपवास सोडताना (इफ्तार) हलक्या पदार्थांनी सुरुवात करा. खजूर आणि पाणी हे पारंपरिक आणि आरोग्यदायी पर्याय आहेत. तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा, कारण हे पदार्थ पचनाला त्रासदायक ठरू शकतात. भाज्या, फळे, आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते.

झोप आणि व्यायामाचे नियोजन करा

रमजानमध्ये उपवास करत असताना शरीराला पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे आहे. रात्री उशिरा झोपून लगेच सकाळी उठल्याने थकवा जाणवू शकतो, म्हणून शक्य तितकी विश्रांती घ्या. सौम्य व्यायाम (जसे की चालणे ) इफ्तारनंतर करा.

मधुमेह आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्या

मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी रोजे ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. औषधे घेण्याची वेळ आणि प्रमाण योग्य ठेवा. शुगर किंवा रक्तदाब खूप कमी झाल्यास तत्‍काळ डाॅक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या.

मानसिक आणि शारीरिक संतुलन राखा

रमजानमध्ये केवळ उपवास नव्हे, तर मानसिक शांतीही महत्त्वाची आहे. सकारात्मकता आणि संयम ठेवा. ध्यान आणि प्रार्थना केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. नैराश्य किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास कुटूंब आणि मित्रांशी संवाद साधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT