नवी दिल्ली : मुंबई हल्ल्यातील (२६/११) आरोपी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाऊ शकते. अमेरिकेच्या न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिली आहे. यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली असल्याचे समजते.
तहव्वूर राणाने प्रत्यार्पणाला विरोध करण्यासाठी अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये, यूएस कोर्ट ऑफ अपील फॉर नाइनथ सर्किटने निर्णय दिला की भारत आणि अमेरिका यांच्यातील करारानुसार राणाला प्रत्यार्पण केले जाऊ शकते. राणाने कनिष्ठ न्यायालये आणि अनेक फेडरल न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई गमावल्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोमधील नॉर्थ सर्किट कोर्ट ऑफ यूएस कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. २३ सप्टेंबर रोजी, सर्किट कोर्टाने देखील राणाची याचिका फेटाळून लावली. २६/११ च्या हल्ल्यात राणाच्या सहभागाचे भक्कम पुरावे भारताने अमेरिकेच्या न्यायालयात सादर केले आहेत.
डिसेंबर २०२४ मध्ये, अमेरिका सरकारने प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वूर राणाने दाखल केलेली याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजल्स येथे तुरूंगात आहे. तहव्वूर राणाला ऑक्टोबर २००९ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली होती. मुंबई हल्ल्यातील सहभागाबद्दल त्याला ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.