Taj Mahal Monkey Menace जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध ताजमहाल च्या प्रवेशद्वारांवर मांकडांच्या झुंडी फिरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या वास्तूंपैकी एक ताजमहाल आहे. याच्या परिसरात सध्या माकडांच्या टोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या टोळ्यामध्ये ५०० ते ७०० माकडे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देशी-विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या ताजमहालच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ताजमहालच्या परिसरात माकडांचे मोठे कळप मुक्तपणे फिरत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माकडांनी ताजमहालच्या पूर्व, पश्चिम आणि शाही दरवाजांच्या आसपासच्या परिसरावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना माकडांच्या हल्ल्याची भिती कायम आहे. यापूर्वीही अनेक भारतीय आणि परदेशी पर्यटकांना माकडांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्रशासनाकडून माकडे पकडण्याचे प्रयत्न
ताजमहाल संकुलात आणि आसपासच्या परिसरात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे मानले जाते. प्रशासनाकडून या माकडांना पकडण्याचे किंवा हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वारंवार सांगितले जात असले, तरी ही समस्या अद्याप कायम आहे. या वास्तूच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या विविध विभागांमध्य समन्वय नसल्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे अधिकच कठीण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वीही ताजमहाल परिसरातील एका कारंज्यात माकडे पाण्यात खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओमध्ये माकडे कारंज्यात उड्या मारताना, पाणी उडवताना आणि एकमेकांचा पाठलाग करताना दिसत होती. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांना माकडांनी चावा घेतल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यामध्ये ब्राझीलमधील एका ८३ वर्षीय परदेशी पर्यटकाचा, तर पश्चिम बंगालमधील एका पर्यटकाचा समावेश होता.