Taj Mahal drone protection
आग्रा : भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि जागतिक वारसा असलेला ताजमहाल लवकरच अधिक सुरक्षित होणार आहे. ताजमहालच्या सुरक्षेत आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार असून, लवकरच अँटी-ड्रोन प्रणालीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
सध्या ताजमहाल परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि उत्तर प्रदेश पोलिस यांच्याकडून सुरक्षा दिली जाते. मात्र, आता हवाई धोके टाळण्यासाठी आणि ड्रोनद्वारे होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना अटकाव करण्यासाठी ही प्रणाली बसवली जाणार आहे.
या निर्णयामागे पार्श्वभूमी आहे 7 मे रोजी भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या अचूक हल्ल्याची. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर तोफगोळे, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे प्रतिहल्ले करण्यात आले.
भारतीय सैन्याने सर्व हवाई हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले आणि ते यशस्वीरित्या परावृत्त केले. या घडामोडींनंतर देशातील संवेदनशील स्थळांवर ड्रोनविरोधी उपाययोजनांची गरज प्रकर्षाने जाणवली.
ताजमहाल सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सय्यद आरिब अहमद यांनी सांगितले, “ताजमहालच्या मुख्य घुमटाभोवती सुमारे 200 मीटरच्या परिघात प्रभावी असलेली ही अँटी-ड्रोन प्रणाली सुमारे 7 ते 8 किमीपर्यंत ड्रोनचे अस्तित्व ओळखू शकते.” ही प्रणाली ड्रोनचे सिग्नल जॅम करून त्याला निष्क्रिय करते, याला 'सॉफ्ट किल' असे म्हणतात.
ते पुढे म्हणाले, “पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रणालीच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी विशेष प्रतिसाद पथक (response team) तयार केले जात आहे. हे पथक ड्रोन कोठून उडवले गेले याचा मागोवा घेऊन त्या जागेची सुरक्षा सुनिश्चित करेल.”
अहमद यांनी यासंदर्भात सांगितले की, पुढील काही दिवसांत ही प्रणाली ताजमहाल परिसरात पूर्णतः कार्यान्वित होईल. ही प्रणाली बसवल्यानंतर ताजमहालच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण वाढ होईल.
ताजमहाल हा युनेस्कोच्या जागतिक वारशाच्या यादीतील एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा असून, दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. ताजमहल ही भारताची सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळेच त्याची सुरक्षा हा सर्वोच्च प्राधान्याचा विषय मानला जातो.
ताज महलला दरवर्षी सुमारे ७ ते ८ मिलियन (७० लाख ते ८० लाख) पर्यटक भेट देतात. ताज महल हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेले स्मारक असून, विशेषतः ऑक्टोबर ते मार्च या हंगामात पर्यटकांची संख्या वाढते. ताज महलला दररोज ३५,००० ते ४०,००० पर्यटक भेट देतात, परंतु सुट्टीच्या दिवशी किंवा विशेष प्रसंगी ही संख्या ६०,००० ते ७०,००० पर्यंत पोहोचू शकते.
पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) ने दररोज ४०,००० पर्यटकांची मर्यादा निश्चित केली आहे.
ताज महलच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या देशांच्या नागरिकांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते: भारतीय नागरिकांसाठी ₹५०, SAARC आणि BIMSTEC देशांच्या नागरिकांसाठी ₹५४०, आणि इतर परदेशी नागरिकांसाठी ₹१,१०० शुल्क आहे.