नवी दिल्ली: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीत सोमवारी १२ दिवसांची वाढ करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेच्या विनंतीवरुन पतियाळा न्यायालयाने दहशतवादी राणाच्या कोठडीत वाढ केली. या अगोदर न्यायालयाने त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली होती. ती मुदत संपल्यानंतर कडक सुरक्षेत राणाला विशेष एनआयए न्यायाधीश चंदरजीत सिंह यांच्यासमोर हजर करण्यात आले.
पतियाळा न्यायालयात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी केले. दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा यांनी दहशतवादी राणांचे प्रतिनिधित्व केले. यावेळी एनआयएने दहशतवादी राणाच्या चौकशीसाठी आणखी वेळेची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले आणि १२ दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली. त्यावरुन न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी पुढील चौकशीसाठी एनआयए कोठडीत वाढ केली.
दरम्यान, १० एप्रिल रोजी दहशतवादी राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण करुन भारतात आणले गेले. त्यानंतर रात्री उशिरा पतियाळा न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले होते. एनआयएला दर २४ तासांनी राणांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि त्यांना दर दुसऱ्या दिवशी त्यांच्या वकिलाला भेटण्याची परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तेव्हापासून राणाची एनआयए मुख्यालयात कसून चौकशी सुरु आहे. त्याने कुटुंबियांसोबत बोलण्याची परवानगी देण्याची मागणी न्यायालयात केली होती. मात्र, एनआयएच्या विरोधानंतर न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावली. मुंबई पोलिसांनीही एनआयए मुख्यालयात येऊन दहशतवादी राणाची ८ तास चौकशी केली आहे. यावेळी त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते.