नवी दिल्ली : दिल्लीच्या पटीयाला न्यायालयाने २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी तहव्वुर राणा याच्या आवाजाचे आणि हस्ताक्षराचे नमुने घेण्याची परवानगी एनआयएला दिली आहे. अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर राणाला १० एप्रिल रोजी भारतात आणण्यात आले. त्याला आणण्यासाठी एनआयएची एक टीम गेली होती.
भारतात आणल्यानंतर त्याला १० एप्रिल रोजी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला एनआयए कोठडीत पाठवण्यात आले. ३० एप्रिल रोजी न्यायालयाने १२ मे पर्यंत कोठडी वाढवली होती. ऑक्टोबर २००९ मध्ये शिकागो येथे अमेरिकन एजन्सी एफबीआयने राणाला अटक केली होती. मुंबई आणि कोपनहेगनमध्ये २६/११ चे दहशतवादी हल्ले करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरवल्याचा आरोप त्याच्यावर होता.