नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर हुसेन राणाच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर यासंबंधीचा खटला दिल्लीत चालवला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने मुंबईतील स्थानिक न्यायालयाकडून खटल्याचे रेकॉर्ड मागवले आहेत. जिल्हा न्यायाधीश विमल कुमार यादव यांनी दिलेल्या आदेशात मुंबईतील न्यायालयाला हे रेकॉर्ड पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए) ने मुंबईतील रेकॉर्ड मिळवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. २६/११ हल्ल्यांशी संबंधित अनेक प्रकरणे दोन्ही शहरांमध्ये असल्याने खटल्याचे रेकॉर्ड यापूर्वी मुंबईत पाठवण्यात आले होते.
दरम्यान, लवकरच दहशतवादी तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. यासंबंधी १४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने मंजूरी दिली आहे. प्रत्यार्पणानंतर तहव्वूर राणाला मुंबईच्या तुरुंगात ठेवले जाईल. यासंबंधीचा खटला मुंबईत चालवला जाणार असल्याचे ते म्हणाले होते. कसाबला मुंबईच्या तुरुंगात ठेवले होते. तसेच राणाला पण ठेवणार, असे फडणवीस म्हणाले होते.