पुढारी ऑनलाईन डेस्क : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषद (DAC) ने माेठ्या खरेदी प्रस्तावांना मान्यता (Acceptance of Necessity - AoN) दिली आहे. हे प्रस्ताव एकूण 54,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा आहे.
भारतीय लष्करासाठी सध्या वापरात असलेल्या 1000 HP इंजिनच्या जागी 1350 HP इंजिन खरेदीस संरक्षण अधिग्रहण परिषदने मंजुरी दिली आहे. इंजिन T-90 रणगाडा (टँक) अद्ययावत रूपातील असून, त्यामुळे विशेषतः डाेंगराळ भागातील लढाईदरम्यान टँकची शक्ती आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
टी-90 हा एक आधुनिक मुख्य युद्धक रणगाडा (Main Battle Tank - MBT) आहे, जो रशियाच्या उरळ्वगॉनझावोड (Uralvagonzavod) या कंपनीने विकसित केला आहे. भारतीय लष्कराने या टँकला "टी-90 भीष्म" असे नाव दिले आहे. हा टँक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, शत्रूच्या रणगाड्यांविरोधात आणि विविध भौगोलिक परिस्थितीत युद्ध करण्यासाठी सक्षम आहे.
टी-90 टँक हे सोव्हिएत युनियनच्या टी-72 टँकच्या सुधारित आवृत्तीवर आधारित आहे. हा टँक 1990 मध्ये प्रथम रशियामध्ये विकसित करण्यात आला आणि नंतर 1993 मध्ये रशियन लष्करात दाखल करण्यात आला. भारतीय लष्कराने 2001 मध्ये टी-90 टँक खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि ते टी-90 भीष्म नावाने भारतीय लष्करात समाविष्ट करण्यात आले.
टी-90 टँक हा एक अत्याधुनिक मुख्य युद्धक रणगाडा (MBT) आहे, जो उच्च गतिशीलता, शक्तिशाली हत्यारे आणि मजबूत संरक्षण प्रणालीने सुसज्ज आहे. यामध्ये 1000 हॉर्सपॉवर (HP) इंजिन असून, लवकरच भारतीय सैन्यामध्ये 1350 HP इंजिनने अद्ययावत करण्यात येणार आहे, ज्यामुळे हा टँक उंच प्रदेशात अधिक प्रभावी मारा करण्यासाठी सक्षम आहे. याचा वेग 60 किमी/तास वेग आहे. तो एकावेळी 500 किमीपर्यंत प्रवास करू शकतो. हत्यारे म्हणून यामध्ये 125mm स्मूथबोर तोफ, जी टँकमधून क्षेपणास्त्र डागू शकते, तसेच 12.7mm आणि 7.62mm मशीनगन्स रणगाड्यामध्ये बसवण्यात आल्या आहेत.
Kontakt-5 ERA (Explosive Reactive Armour) आणि Active Protection System (APS) यांसारख्या संरक्षण यंत्रणेमुळे हा टँक शत्रूच्या तोफगोळ्यांपासून आणि क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित राहतो. तसेच, थर्मल इमेजिंग, नाईट व्हिजन आणि डिजिटल फायर कंट्रोल सिस्टम यांसारखी आधुनिक तंत्रज्ञान आधारित यंत्रणा यामध्ये आहे, ज्यामुळे दिवस आणि रात्री अचूक लक्ष्य भेदणे शक्य होते. भारतीय लष्करात हा टँक मोठ्या संख्येने कार्यरत असून, लडाख आणि राजस्थानसारख्या कठीण भौगोलिक परिस्थितीत त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.