नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी तक्रारीमध्ये विभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे शुक्रवारी (१७ मे) समोर आले. त्यानंतर या प्रकरणी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. परंतू या व्हिडीओची पुष्टी अद्याप झालेली नाही. त्या व्हिडीओमध्ये स्वाती मालीवाल आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संवाद होत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी केजरीवालांचे नाव न घेता निशाणा साधला.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणामध्ये विभव कुमार यांनी गंभीर मारहाण केल्याचा जवाब मालीवाल यांनी तक्रारीमध्ये नोंदवला. पोलीसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये मालीवाल यांनी आरोप केले की, "मी मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी वाट पाहत असताना, अचानक विभव कुमार तिथे आले. विभव कुमार यांनी कोणतीही चर्चा न करता शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ केल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मला ७-८ थापडा मारल्या, निर्दयपणे त्यांना खेचले आणि जाणीवपूर्वक माझा शर्ट वर खेचला. एवढे सगळे होत असतानाही माझ्या (Swati Maliwal) मदतीला कोणीही आले नाही." असे गंभीर आरोप स्वाती मालीवाल यांनी केले आहेत.
स्वाती मालीवाल यांनी तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ १३ मे म्हणजेच मारहाण प्रकरणाच्या दिवशीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतू याविषयीची पुष्टी अद्याप झाली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी 'एक्स'वर पोस्ट करुन केजरीवालांचे नाव न घेता निशाणा साधला.
मालीवाल यांनी पोस्टमध्ये म्हणले आहे की, "नेहमीप्रमाणे राजकीय हिटमनने स्वत: चे रक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर सत्य समोर येईल. एक दिवस प्रत्येकाचे सत्य जगासमोर येईल." अशा प्रकारे स्वाती मालीवाल यांनी जोरदार निशाणा साधला. याप्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत असून, अद्याप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याविषयी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.