पोलिसांनी ७२ तासांत स्वतंत्रला अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. File Photo
राष्ट्रीय

Swatantra Bhardwaj detained : कॉकरोच पार्टीच्‍या विरोधानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; स्वतंत्र भारद्वाजला 'यूपी'तून घेतले ताब्यात

अटकेच्‍या मागणीसाठी CJP चे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी घातला होता संसद मार्ग पोलीस ठाण्‍याला घेराव

पुढारी वृत्तसेवा

Swatantra Bhardwaj detained : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) निदर्शनादरम्यान एका विद्यार्थिनीच्या वडिलांवर हल्ला करणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी CJP चे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह शुक्रवारी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यानंतर पोलिसांनी ७२ तासांत स्वतंत्रला अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केली होती अनेक पथके तैनात

भारद्वाजचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली होती. त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक नैथला गावात पोहोचले असता, तो त्याआधीच बुलेट मोटारसायकलवरून खुर्जाच्या दिशेने पळून गेला. मात्र, तरीही पोलिसांनी पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने हेल्मेट घातले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कठोर कारवाईच्या मागणीसाठी CJP कडून घेराव

यापूर्वी स्वतंत्र भारद्वाजची एक मुलाखत व्हायरल झाल्यानंतर, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कॉकरोच पक्षाने शुक्रवारी सकाळी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. या मुलाखतीत स्वतंत्रने असा दावा केला होता की, जुलैमध्ये जंतरमंतरवर झालेल्या CJP च्या आंदोलनादरम्यान त्याने निशू आझाद या आंदोलक विद्यार्थिनीचे वडील संजय कुमार यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. तसेच, राजकीय वजनामुळे आपल्याला तुरुंगात जावे लागले नाही, अशी दर्पोक्तीही त्याने केली होती. या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर CJP समर्थक आणि दलित कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यावर धडक दिली.

आंदोलकांची दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी

या हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपी स्वतंत्र भारद्वाज याच्यावर कठोर कारवाई केली नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात CJP चे सह-समन्वयक सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद हेदेखील सहभागी झाले होते.

पोलिसांकडून ७२ तासांत कारवाईचे आश्वासन

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याला घेराव घातल्यानंतर, पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात पॉक्सो (POCSO) कायदा, हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी (SC-ST) कायद्याची कलमे वाढवण्याची तयारी दर्शवली होती. तसेच आरोपीला ७२ तासांत अटक करण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले होते.

पोलिसांकडून गुरुवारी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण

तत्पूर्वी, गुरुवारी स्वतंत्रचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी स्पष्टीकरण देताना सांगितले होते की, झटापटीदरम्यान संजय कुमार यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. तसेच, या हल्ल्यात संजयच्या कवटीचे हाड फ्रॅक्चर झाल्याचा स्वतंत्रचा दावा पोलिसांनी वैद्यकीय अहवालाचा दाखला देत पूर्णपणे फेटाळून लावला होता. भारद्वाज आणि दुसरा आरोपी सूरज कुमार यांना घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले होते. तसेच चौकशीनंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली असून, याप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT