राष्ट्रीय

Suvendu Adhikari Bengal’s CM : शुभेंदु अधिकारीच होणार पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री; उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी

अमित शहांच्या उपस्थितीत ऐतिहासिक निवड

पुढारी वृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शुभेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले असून, उद्या (शनिवार, ९ मे) सकाळी ११ वाजता त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात अधिकारी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा मांडतील.

अमित शहांच्या उपस्थितीत ऐतिहासिक निवड

कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत शुभेंदु अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांनी एकमताने अधिकारी यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होत असून, अधिकारी यांची निवड ऐतिहासिक मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन तृतीयांश पेक्षा जास्त जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले आहे.

ममता बॅनर्जींचे सरकार बरखास्त

राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. तत्पूर्वी, ७ मे रोजी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी १७ वी विधानसभा विसर्जित केली होती, ज्यासोबतच ममता बॅनर्जी यांचे सरकारही अधिकृतपणे बरखास्त झाले. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता, मात्र विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने राज्यपालांनी घटनात्मक पाऊल उचलत विधानसभा बरखास्त केली. यामुळे आता शनिवारपासून बंगालमध्ये शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नवे पर्व सुरू होणार आहे.

अधिकारी यांच्या निवडीमागील महत्त्वाची कारणे

शुभेंदु अधिकारी यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्यांनी 'तृणमूल काँग्रेस'च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा सलग दोनवेळा पराभव केला आहे. २०२१ मध्ये नंदीग्राममध्ये आणि यंदाच्या निवडणुकीत थेट ममतांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूरमध्ये जाऊन त्यांना धूळ चारल्याने अधिकारी यांचा दबदबा वाढला होता. भाजपला २०७ जागांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा असून, त्यांना बंगालचा 'किंगमेकर' मानले जात आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी विधानसभेत केलेली कामगिरी आणि त्यांचा प्रशासकीय अनुभव यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

कोलकाता येथे उद्या होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून, देशातील अनेक बडे नेते या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT