नवी दिल्ली : राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे बँकेचे अध्यक्षपद, मंत्रीपद मिळाले तर केंद्रीय मंत्री पदाची शपथ घ्यायला गेल्यावर राष्ट्रपती भवनात पास विचारला गेला, अशा आठवणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितल्या. पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना 'मोदी इज द ग्रेटेस्ट लीडर ऑफ मॉडर्न टाइम्स' असा गौरवपूर्ण उल्लेख केला. राजकारणात आणि इतर कामात व्यस्त असताना पत्नी उमाने सगळा संसार सांभाळला म्हणत त्यांच्या समोरच आभार व्यक्त केले.
राजधानी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत पार पडली. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी मधु दंडवते तेव्हा जर निवडून आले असते तर देवेगौडा नव्हे दंडवते पंतप्रधान झाले असते, यावर त्यांनी सहमती दर्शवली. प्रभू म्हणाले की, वडिलांमुळे सीए झालो, खर तर वकील व्हायचे होते. राजकारणातही लवकर संधी मिळाली. तरुण वयात ३२ व्या वर्षी बँकेचा अध्यक्ष झालो. पुढे केंद्रात मंत्री झालो. रेल्वे अपघात झाल्यानंतर मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावर पंतप्रधानांनी का राजीनामा दिल्याचे विचारले, त्यावेळी अपघातात जी लोक मरण पावली त्यांच्यासाठी मी कुठेतरी जबाबदार आहे आणि नैतिकता ठेवली पाहिजे म्हणून मी राजीनामा दिला.
अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुरेश प्रभू त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश प्रभूंना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितले होते, बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार प्रभूंनी राजीनामा दिला. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन महिने राजीनामा स्वीकारला नाही. बाळासाहेब ठाकरे यांना माझ्या कामाविषयी आणि एकूण गोष्टींविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घ्यायलाही सांगितला होता. मात्र राजीनामा मंजूर झाल्यानंतर पॉवर मंत्र्यांची पॉवर गेली आणि मंत्रीपदही गेले, राजकारण एवढा अनिश्चिततेचा खेळ असतो, असेही ते म्हणाले.
राजकारणाच्या प्रवाहाबाहेर आल्यानंतरच्या व्यस्ततेबाबत बोलताना ते म्हणाले की, आज एका विद्यापीठाचा कुलपती आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि काही ठिकाणी शिकवायला जातो, जगातील अनेक संस्थांशी संबंध आहे, जगभर फिरतो, भाषण करतो, असेही ते म्हणाले.