Supriya Sule
नवी दिल्ली : ‘माझ्या नेतृत्वात चार देशांमध्ये खासदारांचे शिष्टमंडळ जात आहे. यासंदर्भात शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने आम्हाला मार्गदर्शन केले आहे. भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडण्यासाठी आमचा दौरा आहे.’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर हुंडा मुक्त महाराष्ट्र अभियान राज्यभरात राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ शनिवारी इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारताची भूमिका ही कायम दहशतवादाच्या विरोधात आहे. ही भूमिका जागतिक पातळीवर आम्ही मांडणार आहोत. तसेच सध्याची परिस्थिती ही राजकीय टीका करण्याची नाही. आपण देश म्हणून एकत्र राहिलो पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर हुंडा मुक्त महाराष्ट्र अभियान राज्यभरात राबविण्यात येईल. त्या संदर्भात कार्यक्रम आखण्यात येईल. हुंडामुक्त महाराष्ट्र ही गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांची, मुलींची हत्या होते अत्यंत वेदनादायी आहे. असेही त्या म्हणाल्या.
राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे. संजय राऊत म्हणाले तसे एकत्र येण्याच्या गोष्टी मनसे दिलसेच करायच्या असतात. दोघांशीही आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि हे संबंध गेल्या ६ दशकांपासून आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येत असतील, तर ती आनंदाची गोष्ट असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर बोलताना त्या म्हणाल्या की चर्चा कायमच होत असतात. आता ती वेळ नाही आणि शरद पवारांनी आपल्या मुलाखतीत व्यवस्थित सांगितले आहे. तर अलीकडे राज ठाकरे यांनी ‘ठाकरे, पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतोय.
मात्र तो संपणार नाही’ अशा आशयाचे विधान केले होते. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी शून्यातून विश्व उभे केले. शरद पवार हे लढवय्ये आहेत आणि गेली ६ दशके त्यांनी लोकांची सेवा केली आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या तो त्यांचा मोठेपणा आहे, त्याबद्दल मी आभारी आहे, असेही त्या म्हणाल्या.
राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाला ठेवावे किंवा बदलावे हा अधिकार किंवा निर्णय सरकारचा आहे. मात्र मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे आणि परदेश दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. हुंडा मुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही जागर करणार आहोत, सरकारनेही यात मदत करावी, असे त्या म्हणाल्या.