नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळातील खातेबदलात माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘रमीरावांना’ कृषी खात्यातून बदलून क्रीडामंत्रीपद देणे, हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण आहे. ज्यांनी राज्याचा आणि शेतकऱ्यांचा अपमान केला, त्यांनाच प्रमोशन दिले जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.
नुकत्याच झालेल्या खातेबदलात माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून ते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले, तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आले. या निर्णयावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, "अन्नदात्याचा अपमान करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याऐवजी सरकारने त्यांचे प्रमोशन केले आहे. या सरकारमधील मंत्री डान्सबार चालवण्यापर्यंत पोहोचले आहेत, त्यामुळे त्यांनी आणखी काय करायचे बाकी ठेवले आहे?" असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
क्रीडा खात्याच्या जबाबदारीवर बोलताना सुळे यांनी केंद्र सरकारचे उदाहरण दिले. "केंद्रात किरेन रिजीजू क्रीडामंत्री असताना त्यांनी 'खेलो इंडिया'सारखा उत्कृष्ट उपक्रम सुरू केला. आम्ही विरोधक असलो तरी चांगल्या कामाचे कौतुक करतो. आज राज्यातील अनेक तरुण क्रीडा क्षेत्रात करिअर घडवू पाहत असताना, 'रमी' खेळणाऱ्या मंत्र्याला क्रीडामंत्री बनवणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. संसदेतही इतर खासदार मला याबद्दल विचारतात, ही राज्यासाठी भूषणावह बाब नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही भाष्य केले. अमेरिकेने भारतावर लादलेल्या आयात शुल्काबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "अमेरिकेची पाकिस्तानसोबतची मैत्री दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानला एकाच तराजूत तोलण्यास सुरुवात केली आहे, ही एक गंभीर बाब आहे. याविषयी सरकारने संसदेत पुरेशी माहिती दिलेली नाही. देशातील तज्ज्ञांचे सहकार्य घेऊन सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, जेणेकरून देशाच्या व्यापाराचे नुकसान होणार नाही," अशी मागणीही त्यांनी केली.