नवी दिल्ली : ‘शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात झालेली भेट राजकीय नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. शरद पवार अनेक वर्षांनी विधान भवनात गेले होते. त्यांना आमदारांना भेटायचे होते. एकनाथ शिंदे यांचे दालन जवळ असल्याने ते तेथे बसले होते. त्यावेळी शिंदे स्वतः त्यांना भेटायला आले. त्यापलीकडे काहीही घडले नाही. दरम्यान, यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आल्यानंतर माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आता त्यांचे समाधान झाले की नाही, हे तेच सांगू शकतील, असेही सुळे म्हणाल्या. सोबतच पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचे ५-६ खासदार अस्वस्थ असल्याचे वक्तव्य केले. यासंदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करेल, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे दिल्लीत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला गेले होते. ते महाराष्ट्राच्या हितासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी गेले असतील, असे मला वाटते. लोकशाहीत संवाद असला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, "रेवतीच्या लग्नात पृथ्वीराज चव्हाण भेटले होते. त्यानंतर आमची भेट झालेली नाही. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. मी त्यांच्याशी बोलणार आहे. केंद्रातील सत्तेत सहभागी होणार किंवा मंत्री होणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी पूर्णविराम देत मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अशा चर्चा सुरू आहेत. ही निव्वळ चर्चा आहे. अशा बातम्या सातत्याने सुरू आहेत, याचा अर्थ आमचं नाणं अजूनही खणखणीत आहे, असेही सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत त्या म्हणाल्या, मी इतिहासात रमत नाही. दादांची इच्छा आम्ही पुन्हा एकत्र यावे अशी होती. त्यासाठी अनेकदा भेटी झाल्या. मात्र आता दादा नाहीत, त्यामुळे तो विषयही संपला. प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्याशी सुरू असलेल्या संपर्काबाबत त्या म्हणाल्या की, आमचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. प्रफुल पटेल आमच्याकडे नेहमी येतात, ते लपूनछपून येत नाहीत. तटकरे आले, भुजबळही शरद पवारांना भेटायला आले होते.
काँग्रेससोबत विलीनीकरणाच्या चर्चांनाही सुळे यांनी फेटाळून लावले. मी आणि प्रियांका गांधी काही संयुक्त संसदीय समित्यांमध्ये एकत्र आहोत. त्या बैठकींमध्ये विविध विषयांवर चर्चा होते. मात्र कुठेही विलीनीकरणाचा विषय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षण विधेयकाला कोणाचाही विरोध नसल्याचे सांगताना त्यांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणताही प्रस्ताव किंवा चर्चेचे निमंत्रण आले नसल्याचे सांगितले. आम्ही आठ खासदार एकत्र आहोत. प्रस्ताव आल्यावर भूमिका ठरवू," असे त्या म्हणाल्या.
कल्याण-डोंबिवलीतील एका नगरसेवकाच्या गैरवर्तनाच्या प्रकरणावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "हा गलिच्छपणा आहे. संबंधित नगरसेवकाला अटक झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कठोर भूमिका घ्यावी," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, "महाराष्ट्रातील सरकारला सत्तेची जी मस्ती आली आहे, ती जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही," असा आरोपही त्यांनी केला.
नाशिकमधील कळवण येथील घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे विधान भवनात हिंदीत केलेल्या भाषणावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही त्यांची नेहमीची शैली नाही. ते अशी भाषा वापरत नाहीत. त्यामुळे त्यांनी तसे का बोलले, हे माझ्यासाठी आश्चर्य आहे, असे त्या म्हणाल्या. बेळगाव सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकारने राज्याची भूमिका अधिक ठामपणे मांडावी, अशी अपेक्षाही सुळे यांनी व्यक्त केली.