Supriya Sule meets PM Modi
नवी दिल्ली: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विनकरांनी विणलेली पैठणी त्यांना भेट दिली. पंतप्रधान मोदींसह राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही सुप्रिया सुळे यांनी भेट घेत महाराष्ट्रात तयार झालेले पैठणी भेट दिली. हातमाल दिनानिमित्त ही पैठणी भेट दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाल्याचेही समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झालेल्या भेटीचे दोन फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यामध्ये एका फोटोत सुप्रिया सुळे पंतप्रधानांना पैठणीची शाल घालताना तर दुसऱ्या फोटोमध्ये चर्चा करताना दिसत आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या भेटीची चर्चा
दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार आणि अन्य काही महत्त्वपूर्ण गोष्टींच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी संध्याकाळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. गुरुवारी रात्री राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित होते. या दोन कार्यक्रमांच्या मध्ये सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची भेट नक्की कशासाठी, या संदर्भात राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत्या आणि अंदाज बांधले जात होते.